श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन दोन दिवस बंद

करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूळ मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या वतीने मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. 14 ते 15 एप्रिलला ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांच्या काळात देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही.

पितळी उंबऱ्याच्या बाहेरून दर्शनासाठी भाविकांना उत्सवमूर्ती व कलश ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी दिली. देवीच्या मूर्ती संवर्धनासंदर्भात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, कोल्हापूर यांच्यासमोर दावा सुरू आहे. या दाव्यात वादी श्री पूजक गजानन मुनीश्वर व इतरांनी पुरातत्त्वच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून मूर्तीची पाहणी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार गेल्या महिन्यात मूर्तीची पाहणी झाला होती.