
भारतीय कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते कमांडर दत्ताजी साळवी यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्त भारतीय कामगार सेनेच्या दादर येथील कार्यालयात जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दादर येथील कार्यालयात दत्ताजी साळवी यांना भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. उपाध्यक्ष अजित साळवी, सरचिटणीस संतोष चाळके, चिटणीस प्रकाश नाईक, प्रमोद गावकर, रमेश सकपाळ, राम साळगावकर, विजय दळवी, अरुण तोरसकर, एमटीएनल कार्यकारिणीचे सरचिटणीस दिलीप जाधव, सहचिटणीस दिनेश जाधव, लार्सन अॅण्ड टुब्रो युनिट अध्यक्ष सुधा आंगणे, युनिट सरचिटणीस यशवंत सावंत व त्यांचे सहकारी तसेच हॉटेल हयात रिजेन्सी युनिटचे सत्यवान पवार, सचिन पवार, हेमंत रेडकर यांनीदेखील दत्ताजी साळवी यांना आदरांजली वाहिली. लोणावळा येथील भारतीय कामगार सेनेच्या दत्ताजी साळवी स्वप्नपूर्ती येथे पदाधिकाऱयांसह शेकडो शिवसैनिक व कामगारांनी आदरांजली वाहिली. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, लार्सन अॅण्ड टुब्रो, पंचतारांकित हॉटेल्स तसेच विविध जिल्हे तसेच गोव्यातील कामगारांनीही आदरांजली अर्पण केली.


























































