विवस्त्र होऊन पूजा केल्यास कोट्यधीश होता येते! कानपूरमध्ये सासऱ्याचे सुनेशी असभ्य वर्तन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

कानपूरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. करोडपती होण्यासाठी तांत्रिक विधी करण्याच्या नावाखाली पती आणि सासऱ्याने महिलेला विवस्त्र केले. त्यानंतर महिलेला एका खोलीत डांबून ठेवत तिच्यासोबत अश्लील वर्तन करण्यात आले. त्यानंतर तिला बळजबरीने त्याच अवस्थेत पूजेसाठी बसण्यास भाग पाडले. यानंतर पीडितेने कानपूर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

तांत्रिक विधींच्या नावाखाली छळ, जबरदस्ती आणि हुंड्याची मागणी केल्याचे गंभीर आरोप पीडितेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केले आहेत. महिलेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी सासरच्या लोकांविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

आज ताकने दिलेल्या माहितीनुसार, कानपूरच्या साचेंडी भागातील एका श्रीमंत कुटुंबातील मुलीचे 6 मार्च 2024 रोजी पांडू नगर येथील मिश्रा यांच्या मुलाशी लग्न झाले. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, या विवाहसोहळ्यासाठी अंदाजे 5 कोटी रुपये खर्च आला होता. लग्नानंतर सुरवातीला सर्व काही ठीक सुरू होते. काही दिवसांनंतर घरामध्ये तंत्र-मंत्र संबंधित विधी होऊ लागले. या विधीत आपल्यालाही सहभागी होण्यास सांगितले जाऊ लागले, असे पीडितेने सांगितले.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिला पहिल्यांदा मध्यरात्रीनंतर उठवून पूजेत सहभागी होण्यास सांगितले गेले. अशा पूजांमुळे कुटुंबाच्या संपत्तीत आणि व्यवसायात वाढ होते आणि असेच आपण करोडपती झाल्याचा दावा तिच्या सासूने केला. तसेच आपण कोलकाता येथील असून तिथे नियमितपणे तंत्र-मंत्र पूजांना उपस्थित राहत असल्याचेही सासूने सांगितले. पीडितेला पूजेत सहभागी होण्यासाठी काही नियम सांगितले गेले, जे तिला मान्य नव्हते. तिने याला विरोध केला असता घरच्यांनी तिच्यावर दबाव टाकला.

यानंतर पीडितेच्या पतीने आणि सासऱ्यांनी जबरदस्तीने तिचे कपडे काढले. यानंतर, तिला एका खोलीत कोंडून ठेवून तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. त्यानंतर तिला त्याच अवस्थेत पूजेसाठी बसण्यास भाग पाडले गेले. यावेळी तिला मारहाणही करण्यात आली. नंतर, दोन कोटी रुपये आणि एक किलो सोने आणण्यासाठी पीडितेवर दबाव टाकण्यात आला.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, या दरम्यान तिला मारहाणही करण्यात आली. तिला चपलेने मारण्यात आले. पीडितेने तिच्या पतीवरही गंभीर आरोप केले आहेत. तिने तिच्या पतीकडे मदत मागितली, तेव्हा त्याने नकार दिला. पती नेहमी आई-वडिलांचे ऐकत असे आणि तिलाही तसेच करण्यास सांगत असे.

अखेर या सर्व जाचाला कंटाळून पीडितेने सासर सोडण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 2025 मध्ये, ती तिच्या माहेरी परतली आणि घडलेला प्रकार तिने तिच्या कुटुंबीयांना सांगितला. तिच्या जबाबाच्या आधारे, तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि कारवाईची मागणी केली.

पोलिसांनी तक्रारीनंतर तात्काळ एफआयआर दाखल केला नाही, असे पीडितेने सांगितले. तडजोड घडवून आणण्यासाठी अनेक महिने प्रयत्न केले गेले आणि दोन्ही पक्षांना चर्चेसाठी बोलावण्यात आले. तथापि, तडजोड होऊ शकली नाही आणि अखेरीस पोलिसांनी पती, सासू, सासरे, दीर आणि कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला. सर्व आरोपांची चौकशी केली जात आहे आणि समोर येणाऱ्या तथ्यांनुसार पुढील कारवाई केली जाईल, असे एसीपी आशुतोष सिंह यांनी सांगितले.