
>>आश्लेषा महाजन>>
[email protected]
11 ऑक्टोबर हा दिवस जगभर बालिका दिन म्हणून साजर केला जातो. मुलीच्या जन्माचे स्वागतच व्हावे, कोणताही लिंगभाव न बाळगता तिचे जगणे सुकर व्हावे आणि त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार लाभावा याकरिता संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे जागृती केली जाते. हा दिवस साजरा केला जाणं हा या कार्याचाच एक भाग. अशा प्रकारे करत असलेले हे कार्य पाहता मुलींसाठी अशा परिषदा भरवण्याची वेळ माणसांवर येणे हे सुदैवी आहे की दुर्दैवी हेच कळत नाही.
11 ऑक्टोबर- आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. माणसाच्या मुलीचे (बेबी गर्ल!) रक्षण व्हावे म्हणून माणसांना (स्त्री-पुरुषांना) आंतरराष्ट्रीय पातळीवर जागृती घडवणारे अनेक कलमी कार्यक्रम राबवावे लागत आहेत. युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयात दरवर्षी ‘बालिका दिनानिमित्त’ भव्य परिषद भरते. देशोदेशीच्या मुलींसह अनेक सदस्य देशांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते त्यात सहभागी होतात. जन्मदात्यांनी मुलींचा जन्म नाकारू नये, त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. लिंगभाव मनात बाळगून त्यांची उपेक्षा करू नका, त्या उद्याची विश्वजननी आहेत हे माणसांनाच माणसे तिथे सांगतात. मुलींना शिक्षण, प्रशिक्षण आणि उद्योगव्यवसायांच्या मुख्य प्रवाहात घ्यावे म्हणून जागर करतात. मुलींना सामाजिक अभिसरणात येण्यासाठी प्रेरणा द्या, नवे काही घडवण्याची उमेद द्या, भविष्य साकारण्यासाठी आत्मिक बळ द्या असे आवाहन केले जाते. युनायटेड नेशन्स गंभीरपणे करत असलेले हे कार्य पाहता मुलींसाठी अशा परिषदा भरवण्याची वेळ माणसांवर येणे हे सुदैवी म्हणावे की दुर्दैवी हेच कळत नाही.
ग्लोबल मंचवर घडणाऱया त्या भव्य सोहळ्यावरून माझी नजर लोकल गल्लीपाशी पोहोचते तेव्हा पाच मुलींनंतर गर्भवती असलेली राजम्मा मला दिसते. आपले भलेमोठे पोट सावरत ती म्हणते, “लडका चाहिये. नही तो आदमी घर से बाहर निकालेगा.’’ शिकलेल्या घरांतही मुलग्यासाठी तिसरा वा चौथा चान्स घेणारी मंडळी आजही आहेत. एका परिचित डॉक्टरनेही हॉस्पिटलचा पसारा सांभाळण्यासाठी दोन मुलींनंतर तिसरा मुलगा पदरात पाडलेला आहे. मुलगा हवाच, मुलगी नसली तर हरकत नाही असे अनेकांचे मत दिसते. त्यात खुद्द स्त्रियांनाच ‘पुत्रवती’ होण्याची तीव्र इच्छा असते. मुलगी(च) हवी अशी इच्छा व्यक्त करणारी मंडळी संख्येने कमी. सुदैवाने शहरांमध्ये मुलींच्या जन्माचे स्वागत होताना दिसते आहे. एक वा दोन मुलींवर थांबणारी ग्रामीण व निमशहरी भागातही काही मंडळी आहेत. ते सन्माननीय अपवाद आहेत. एक मुलगी, एक मुलगा असे आदर्श, समतोल चौकोनी कुटुंब असावे असेही अनेकांचे स्वप्न असते, पण हा निसर्गाचा खेळ आहे. त्यात माणसाने ढवळाढवळ न करण्यातच शहाणपण आहे. मुळात प्रत्येक घर वेगळे असते, युनिक असते हे समजून घ्यायला हवे. एखाद्या घरात मुलगी वा मुली, एखाद्या घरात मुलगा वा मुले, दुसऱया घरात मुलगा व मुलगी दोघेही. एखाद्या घरात मूलच नसते, एखाद्या घरात दत्तक मूल असते. हे वैविध्य आपण मान्य करायला हवे.
पाच वर्षांचा मुलगा असणाऱया एका मैत्रिणीला मी सहज विचारले होते, “आता ह्याला बहीण पण येणार का?’’ त्यावर पाल झटकल्यासारखी ती म्हणाली, “छे! मुलगा झाला, गंगेत घोडं न्हालं. आता परत मुलगी झाली तर…? नको रे बाबा! मुलीची झंझट काय असते, ते तुला नाही कळायचं..’’ मला दोन्ही मुलगेच असल्याने हे मला अनेक जणी ऐकवतात. “झंझट? अगं, तू स्वतः एक ‘मुलगीच’ आहेस ना?’’ हा माझा त्राग्याचा प्रश्न तिला सोयिस्करपणे ऐकूच नाही आला. “आम्ही आधुनिक विचारांचे असल्याने एकाच अपत्यावर थांबत आहोत.’’ ती मानभावीपणे म्हणाली खरी, पण ‘झंझट’ हा शब्द मनावर आदळत राहिला. आजही बेकायदेशीर गर्भलिंगचाचणी करून शिक्षित मंडळी मुलग्यांनाच जन्माला घालण्याचा घाट घालत आहेत. नीतिभ्रष्ट डॉक्टर्स त्या पापात सहभागी आहेत हे महादुर्दैव!
एका सखीचे विचार वेगळे होते. “पहिली मुलगी असताना आम्ही एक चान्स घेणार. मुलगा झाला वा वा! मुलगी झाला वा वा! अपत्याला साथीदार हवा. एकुलते मूल नको. त्याने त्याची आणि पालक म्हणून आमचीही स्वामित्वभावना बळावू शकते. एकाला दुसरा असला की, सहजीवन, शेअरिंग होते.’’
आमच्या एका मैत्रिणीच्या बाबतीत निसर्ग विलक्षण खेळ खेळला. तिला पहिली मुलगी. दुसऱयांदा गरोदर राहिली आणि कळले की, पोटात जुळे आहे! झालं! आजच्या जमान्यात ही दोन मुली नि एका मुलग्याची आई झाली. लोकशिक्षण, जागृती, महागाई, गतिमान जीवन, लोकसंख्या विस्फोटाविषयीची जाणीव पाहता हल्ली एखादेच अपत्य जन्मास घालण्याची योजना तरुण मंडळी करतात. काही जण ‘मूल नको’वालेही आहेत. ही सगळी उदाहरणे त्या त्या दांपत्याचे खासगी निर्णय असले तरी निसर्गाला छेद देण्याचा हा प्रयत्न मुळावर घाव घालणारा आहे. मुलींची संख्या घटतेच आहे हे कटुसत्य नाकारता येत नाही. भविष्यात लग्नाच्या बाजारात मुली मिळणार नाहीत, कदाचित ‘द्रौपदीसारखे बहुपतित्व’ स्वीकारावे लागेल ही धोक्याची घंटा वाजत असताना समाजपुरुष जागा का होत नाही? हाच प्रश्न छळतो आहे. घराण्याला वारस, चितेला अग्नी द्यायला मुलगा हवा, म्हातारपणाची काठी… या कल्पना आता कालबाह्य झालेल्या आहेत हे आजच्या बालिका दिनी कंठी-कपाळी ओरडून सांगायला हवे.
पालकांना खूप सांगून झाले. आता बालिका दिनानिमित्त मी मुलींना हे सांगेन- मुलींनो, स्वतःवर प्रेम करा. आपल्या मनावर नि शरीरावर प्रेम करा. प्रेम करणे सुंदर असते. सौंदर्यात शक्ती असते. शक्ती आत्मविश्वास देते. आत्मविश्वास देतो भरारी. भरारीला आकाशाचे पंख असतात. ते पंख तुमचे आहेत. तुम्ही खरंच सुंदर आहात. जशी सुंदर असते पहाट. ती दिवसाला गती देते, पळवते. तुम्हीही गती द्या दिवसाला, मांडा नकाशा पृथ्वीचा. खेळा वाऱयावर, मातीवर, क्षितिजावर मुक्तपणे… तुम्ही हुशार आहात, जशा हुशार असतात सगळ्या नद्या. त्या त्यांना हवे तसेच वाहतात, कृत्रिम बांध फोडून टाकतात. मानवी हस्तक्षेप वाढला तर ऊरमोडय़ा होतात. नदीप्रमाणेच कुणालाही गृहीत धरू नका, स्वतःला गृहीत धरू देऊ नका. त्याचवेळी कठोरपणात मायाळूपणाही मिसळा. दोन्ही शहाण्या किनाऱयांना ओली-हिरवी श्रीमंती द्या. तुम्ही पोषिता आहात, जशा पावसाच्या धारा. नवे निर्माण करण्याची त्यांना ओढ असते. तुम्ही आहात ‘पुनर्नवा’. पुनः पुन्हा नव्या होता तुम्ही सहजपणे. काळनदीच्या प्रवाहातल्या दीपिका आहात तुम्ही.
मुलींनो, आपले ‘मुलगीपण’, आपले ‘गर्लहूड’ समाजावर ठसवा. ऐटीत रहा. आपल्यातल्या ऊर्जेचाच उत्सव करत रहा. तुम्ही प्रगल्भ आहात, पण हा समाज अजूनही बालिश आहे, अडाणी आहे, स्वार्थी आहे. वेड घेऊन पेडगावला जायची त्याची जुनी खोड आहे. त्याच्यापाशी दूरदर्शीपणा नाही, त्याच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घाला. लख्ख करा त्याची दृष्टी नि त्यातच तुमचे स्वच्छ हसरे बिंब पाहत रहा…



























































