हिंदुस्थानने उडवला पाकिस्तानचा धुव्वा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 60 वर्षांनंतर झालेल्या दौऱयात गाजवले निर्विवाद वर्चस्व

पाहुण्या हिंदुस्थानने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा त्यांच्या घरात घूसन 4-0 फरकाने धुव्वा उडविला. या निर्विवाद वर्चस्वासह हिंदुस्थानने या स्पर्धेच्या पुढच्या फेरीत (वर्ल्ड ग्रुप-1) प्रवेश केला. या पराभवामुळे पाकिस्तानी संघाला पुन्हा एकदा ग्रुप-2 मध्येच खेळावे लागणार आहे.

हिंदुस्थाने शनिवारी पहिल्या दिवशीच 2-0 अशी आघाडी घेत जोरदार मुसंडी मारली होती. रविवारी दुसऱया दिवशी युकी भाम्ब्री आणि साकेत मयनेनी या जोडीने पाकिस्तानच्या मुर्तझा आणि अकील खान या जोडीचा 6-2, 7-6 (5) असा पराभव करत ही आघाडी 3-0 अशा आणखी भक्कम केली. पाकिस्तानने पुरुष दुहेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात बरकत उल्लहच्या जागेवर अकील खानला संधी दिली, मात्र याचा काही फायदा झाला नाही.

हिंदुस्थानने चौथ्या सामन्यात 28 वर्षीय निकी पूनचा याला कोर्टवर उतरविले. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात मोहम्मद शोएबचा 6-3, 6-4 असा पराभव करीत पाकिस्तानचा सुपडा साफ केला. हिंदुस्थानने 4-0 फरकाने निर्भेळ यश संपादन केल्यामुळे स्पर्धेत परतीच्या सामन्यांची गरजच पडली नाही.

यंदाच्या डेव्हिस चषकात हिंदुस्थानी संघासमोर पाकिस्तानात खेळण्यासोबतच तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याचेही आव्हानात्मक होते, मात्र कडाक्याच्या थंडीतही सर्वच हिंदुस्थानी खेळाडूंनी सरस कामगिरी केली. त्यांच्या भोवती सुरक्षा रक्षकांचा मोठा गराडा होता. हिंदुस्थानी खेळाडूंच्या फिरण्यावरही बंधने होती. पाकिस्तान टेनिस फेडरेशनने हिंदुस्थानी खेळाडूंच्या सुरक्षेची चांगली काळजी घेतली.

1964 मध्ये केला होता अखेरचा दौरा

हिंदुस्थानच्या डेव्हिस चषक संघाने याआधी 1964 मध्ये अखेरचा पाकिस्तानी दौरा केला होता. त्यावेळीदेखील पाहुण्या हिंदुस्थानी संघाने यजमान पाकिस्तानी संघाची 4-0 फरकाने दाणादाण उडविली होती. यावेळीदेखील हिंदुस्थानी संघाने 4-0 अशी बाजी मारत 60 वर्षांपूर्वीच्या यशाची पुनरावृत्ती करून दाखविली.

हिंदुस्थान पात्रता फेरीसाठी खेळणार

हिंदुस्थानचा डेव्हिस चषक संघ आता पात्रता फेरी गाठण्यासाठी सप्टेंबरमध्ये जागतिक गट-1 स्पर्धेत सर्वस्व पणाला लावणार आहे. जागतिक गट-1 स्पर्धा ही होम आणि अवे अशा पद्धतीने होणार आहे. पात्रता फेरीतील पराभूत 12 संघ आणि जागतिक गट-1 स्पर्धेत दाखल झालेले 12 संघ अशा एकूण 24 संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.