
माझे संबंध थेट दाऊद इब्राहीम यांच्याशी जोडून सवंग प्रसिद्धीसाठी हपापलेली हिंदुस्थानी मीडिया खोटारडी आहे आणि कश्मीरप्रश्नी मूग गिळून गप्प बसणारे हिंदुस्थानचे बॉलिवूड पार ढोंगी आहे, असा संतप्त हल्ला पाकिस्तानी अभिनेत्री आणि दाऊद इब्राहीम याची पाकिस्तानी मैत्रीण अभिनेत्री महविश हयात हिने हिंदुस्थानी प्रसिद्धीमाध्यमांवर केला आहे.
पाकिस्तानात ’गँगस्टर गुडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱया महविशचे गँगस्टर दाऊदशी असलेली जवळीक पाकिस्तानी मेडियानेच उघड केली होती. त्यावर हिंदुस्थानी प्रसिद्धीमाध्यमांनी सविस्तर वृत्तांकन केल्याने महविश भडकली आहे.मी अशा गटार पत्रकारितेला भीक घालत नाही. कारण खोटय़ा स्टोऱ्या छापून आपला धंदा करणाऱया अशा मीडियाला उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही. हिंदुस्थानी बॉलीवूडला कश्मिरी जनतेवरील लष्कराचे अत्याचार दिसत नाहीत. कारण हे बॉलिवूड पार ढोंगी आहे, असा आरोपही महविशने केला.
अभिनेत्री महविशची पाकिस्तानात चलती
पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री महविश हयातला चित्रपटात भूमिका मिळतात. कारण गँगस्टर दाऊद इब्राहीमशी तिची घनिष्ठ मैत्री आहे. दाऊदने पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत आपला काळा पैसे गुंतवला आहे. त्यामुळे त्याच्या आदेशाने पाकिस्तानी चित्रपट क्षेत्रात महविशची मोठी चलती आहे, अशी वृत्ते खुद्द पाकिस्तानी मीडियाने प्रसिद्ध केली होती. महविश ही दाऊदची नवी गर्लफ्रेंड आहे.

























































