मंत्रिपदं केवळ मिरविण्यासाठी नाहीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भरला दम

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दुष्काळी मराठवाड्यावर अक्षरशः थापांचा पाऊस पडला. या बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना दम भरला. मंजूर झालेली कामं होतात की नाही हे पाहणे पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करावा. मंत्रीपद हे नुसते मिरवण्यासाठी नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी खडेबोल सुनावले.

अजित पवार म्हणाले, मराठवाड्याला यंदा चांगली मंत्रिपदे मिळाली आहेत. मात्र, मंत्रिपदे नुसती भुषवायची नसतात. मंत्रिपदाचा फायदा घ्या. माझी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी योजनांचा दर आठवड्याला आढावा घेतला पाहिजे.

सरकार मराठवाड्यासाठी योजना जाहीर करते. मात्र, नंतर त्या योजनांचे कामच पूर्ण होत नसल्याचे दिसते. सरकार ज्या योजना जाहीर करेल, त्या योजनांचे काय झाले, याची दर आठवड्याला पालकमंत्र्यांनी माहिती घेतली पाहिजे. आढावा बैठक घेतली पाहिजे. काम कुठपर्यंत आले आहे, कुठे रखडले आहे, याची माहिती घ्यावी, असेही ते म्हणाले.

नुसती घोषणा करायची आणि निघून जायचं; दुष्काळग्रस्तांवर थापांचा पाऊस, मराठवाड्याला मिंध्यांनी गंडवले

काही अडचणी असतील तर मुख्यमंत्री कार्यालय किंवा उपमुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला पाहिजे. तेथून समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केले तरच योजना पूर्णत्वास जावू शकतात. तसेच सकाळी लवकर उठून कामाला लागा, लोक येतात, असेही अजित पवार म्हणाले.