
सामना प्रतिनिधी । पुणे
आयुष्यातीला कंटाळून महिलांनी गळफास घेऊन आत्महत्या करून त्यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ससून रूग्णालयाच्या गलथान कारभारामुळे मृत्यूनंतरही अहवेलनांचा प्रवास थांबला नाही. शवागारात चक्क मृतदेहांची आदलाबदली झाली. काही तासानंतर हा प्रकार समोर आला. साताऱ्याकडे निघालेला मृतदेह अर्ध्या वाटेतून पुन्हा ससूनमध्ये बोलवून घ्यावा लागला. त्यानंतर खातरजमा करून मृतदेह नातेवाईकांना देण्यात आले. या प्रकारामुळे नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला.
हडपसर रामटेकडी येथील एका महिलेने तर सातारा येथील एका तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या दोघींचेही मृतदेह मंगळवारी सकाळी ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. शवविच्छेदन पूर्ण होताच सातारा येथील मृत तरूणीचा मृतदेह पोलीस आणि नातेवाईकांच्या ताब्यात देऊन त्यावर स्वाक्षरी घेतला आणि हा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी नातेवाईक घेऊन गेले.
दुपारी एकच्या दरम्यान हडपसर रामवाडी येथील महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक शवागारात आले. त्यांनी मृतदेह पाहिला असता, तो त्यांच्या महिलेचा नसल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांनी इतर मृतदेह तपासले, पण हडपसर येथील महिलेचा मृतदेह तेथे नव्हताच. मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर एकच गडबड उडाली. कर्मचाऱ्यांनी साताऱ्याकडे निघालेल्या मृतदेहाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून झालेली गडबड लक्षात आणुन दिली. त्यांना ससून रुग्णालयात परत बोलविणत आले. त्यानंतर हे मृतदेह संबंधीत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकारामुळे नातेवाईकांना मनस्तापाला सामोरे जावे लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

























































