
नातेवाईक आणि शववाहिका चालकांच्या गोंधळामुळे शनिवारी रात्री जिल्हा रुग्णालयातून नाशिकच्या मृत व्यक्तीचा मृतदेह भोपाळकडे रवाना झाला होता,तर नाशिकच्या मृत व्यक्तीच्या शववाहिकेत भोपाळच्या व्यक्तीचा मृतदेह ठेवण्यात आला होता. ही घटना लक्षात येताच भोपाळकडे जात असलेल्या शववाहिकेशी संपर्क साधून दोन्ही मृतदेहांची चांदवड टोलनाक्यावर अदलाबदल करून ते संबंधित नातलगांच्या ताब्यात देण्यात आले.
नाशिक जिल्हा रुग्णालयात शनिवारी भोपाळ व नाशिक येथील दोन पुरूष व्यक्तींचे निधन झाले. दोघांचेही वय 65 वर्षे इतके होते. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृत व्यक्तींचे नातेवाईक आणि पोलीस यांच्यासमोर ओळख पटवून रुग्णालयाने मृतदेह दोन्ही नातेवाईकांकडे दिले. त्याबाबतची रितसर नोंदही घेण्यात आली. भोपाळला जो मृतदेह नेला जाणार होता त्यासाठीशववाहिका आधी आली. संबंधित नातेवाईकांनी घाईगर्दीत नाशिकच्याच व्यक्तीचा मृतदेह शववाहिकेत ठेऊन ते भोपाळकडे रवाना झाले. नाशिकच्या नातेवाईकांनीही त्यानंतर अशीच घाई करीत भोपाळच्या व्यक्तीचा मृतदेह शववाहिकेत ठेवला. एक-दीड तासानंतर अंत्यसंस्काराला नेत असताना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. आपल्या नातेवाईकाचा मृतदेह हा नसल्याचे समजताच त्यांची धावपळ सुरू झाली. भोपाळकडे रवाना झालेल्या शववाहिकेत नाशिकचा मृतदेह असल्याचे लक्षात आल्यानेशववाहिका चालकाने भोपाळकडे जात असलेल्या शववाहिका चालकाशी संपर्क साधून गोंधळाची माहिती दिली. धुळ्याहून ती शववाहिका नाशिकच्या दिशेने, तर नाशिकची शववाहिका धुळ्याच्या दिशेने रवाना झाल्या. चांदवड टोलनाक्यावर दोन्ही मृतदेहांची नातेवाईकांनी अदलाबदल करून आपआपल्या नातेवाईकांचे मृतदेह ताब्यात घेतले.
जिल्हा रुग्णालयाचा संबंध नाही
या घटनेत जिल्हा रुग्णालयाचा कुठलाही संबंध नाही,दोष नाही,असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक निखील सैंदाणे यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर ओळख पटवूनच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातात. शववाहिका चालक आणि नातेवाईक यांच्या चुकीमुळे ही घटना घडली आहे. ही चुकही त्यांनी मान्य केली आहे, असेही डॉ. जगदाळे व सैंदाणे यांनी स्पष्ट केले आहे.































































