
मूकबधिर व मानसिक तणावाखाली असलेल्या विवाहितेने तिच्या 39 दिवसांच्या मुलीला इमारतीच्या 14 व्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून खाली फेकल्याची दुर्दैवी घटना मुलुंड येथे घडली. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात मातेविरोधात हत्येच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलुंड पश्चिमेकडील झवेर मार्गावर असलेल्या एका टॉवरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपी माता ही त्या टॉवरमध्ये राहणाऱया तिच्या भावाकडे आली होती. गुरुवारी रात्री ती माता तिच्या मुलीसोबत घरात झोपलेली होती, पण सकाळी जेव्हा घरच्यांनी पाहिले तर मुलगी जागेवर नव्हती. त्यामुळे घरात घबराट पसरली. सर्वत्र शोधाशोध सुरू केल्यावर टॉवरच्या वॉचमनने सांगितले की, गणेश गावडे मार्गावरील योगेश इमारतीच्या आवारात एक बाळ पडलेले असल्याचे सांगितले. त्यामुळे विवाहितेच्या भावाने तिथे धाव घेतली असता ते बाळ त्याचीच भाची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मूकबधिर असलेल्या आईनेच खिडकीतून खाली मुलीला फेकून दिल्याचे निष्पन्न झाले. त्या मातेविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.



























































