
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई व पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या मध्य रेल्वेच्या ‘डेक्कन क्वीन’ला येत्या शुक्रवार, १ जून रोजी ८८ वर्षे पूर्ण होत आहेत. ‘डेक्कन क्वीन’अर्थात ‘दख्खनची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ट्रेनची सुरुवात १ जून १९३० रोजी ब्रिटिश आमदनीत ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीने केली होती. ही ट्रेन त्या काळातील पहिली डीलक्स ट्रेन म्हणून ओळखली गेली. या गाडीला स्वतंत्रपणे ‘डायनिंग कार’ जोडण्यात आल्याने ही गाडी फिरते रेस्टॉरंट म्हणून प्रसिद्ध झाली आहे. सुरुवातीला सात डब्यांची असलेली ही गाडी नंतर १२ आणि आता १७ डब्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाडीची सुटण्याची वेळ आणि येण्याची वेळ सहसा कधी चुकलेली नाही. त्यामुळे पुणे ते मुंबई अशी रोजची अप-डाऊन करणारी नोकरमंडळीही या गाडीची चाहती आहेत. हायकोर्टात प्रॅक्टिस करणारे अनेक वकील या गाडीने पुण्याला दररोज ये-जा करीत असतात.
























































