
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी असलेल्या भाजप आमदार नीतेश राणे यांच्या नियमित जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायालयात आज सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत उद्या निर्णय सुनावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आमदार राणे यांना जामीन मिळणार की नाही हे उद्या स्पष्ट होणार आहे.
याप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी यांनी तर बचाव पक्षाच्या वतीने वकील सतीश मानेशिंदे, संग्राम देसाई यांनी जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश हांडे यांनी निकाल उद्या जाहीर केला जाईल असे जाहीर केले आहे. सुनावणीपूर्वी झालेल्या युक्तिवादात दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणेंच्या वकिलांवर दादागिरीचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजू समजून घेत प्रत्यक्ष जामीन अर्जावर सुनावणीस प्रारंभ केला.
यावेळी आमदार राणेंचे वकील संग्राम देसाई युक्तिवाद करताना म्हणाले, सुपारी देऊन हल्ला करायला लावला असे मोठमोठे शब्द सरकार पक्षाकडून वापरले जात आहेत. पैसे दिले, घेतले असा पोलीस तपासात कुठेही उल्लेख नाही. धीरज जाधवला सचिन सातपुतेने 10 हजार दिले होते आणि सरकार पक्ष एक लाखाला सुपारी दिली असे म्हणत आहे. याबरोबरच नीतेश राणे यांच्यावर 11 आणि राकेश परब यांच्यावर दोन केस असल्याचे सांगितले जात आहे, मात्र यातील अनेक खोटय़ा केसेस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


























































