
येत्या सोमवारपासून मुंबई विद्यापीठाशी संलग्नित डिग्री कॉलेजेस सुरू होतील का, याबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 15 फेब्रुवारीपासून वर्ग सुरू करण्यासाठी पालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱयांची परवानगी घेण्याची जबाबदारी विद्यापीठाने प्रत्येक कॉलेजच्या खांद्यावर ढकलली आहे. त्याचबरोबर लोकल प्रवासावर मर्यादा असल्याने कॉलेजच्या वेळेत विद्यार्थी, प्राध्यापकांच्या लोकल प्रवासाची समस्याही मोठी आहे.
कॉलेज व्यवस्थापनाने करावयाचे सेफ्टी ऑडिट, यूजूसीच्या सूचनांप्रमाणे अभ्यासक्रमातील कपात, कॉलेजच्या वेळा आणि परीक्षांविषयी अजूनही विद्यार्थ्यांसह प्राचार्य, प्राध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 15 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित डिग्री कॉलेज सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
याविषयीच्या अध्यादेशात संबंधित विद्यापीठाने पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून त्यांच्या सहमतीनंतरच कॉलेज सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात, असे म्हटले आहे. मात्र मुंबई विद्यापीठाने स्वतःच्या खांद्यावरील जबाबदारी झटकून प्रत्येक कॉलेजने पालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱयांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले. याला प्राध्यापकांच्या बुक्टो संघटनेने विरोध करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढलेल्या अध्यादेशाप्रमाणे कॉलेज सुरू करण्याची जबाबदारी विद्यापीठाची असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई विद्यापीठाचा स्थानिक प्रशासनाशी पत्रव्यवहार
बुक्टोसह अन्य संघटनांच्या विरोधानंतर मुंबई विद्यापीठाने संलग्नित कॉलेज असलेल्या विभागातील जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांना 15 फेब्रुवारीपासून कॉलेजेस सुरू होत आहेत याविषयीचे पत्र पाठविल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉलेज सुरू करण्याविषयी लवकरच विद्यापीठ प्राचार्यांसोबत बैठक घेणार आहे.
कॉलेजचे ऑडिट आवश्यक
कॉलेज सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दक्षतेच्या उपाययोजना म्हणून उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी कॉलेजमधील विद्युत पुरवठा व उपकरण सेवा, इमारत बांधकाम मजबुती, पाणी पुरवठा यांचे ऑडिट करण्याच्या सूचना सर्व विद्यापीठांचे कुलसचिव व सर्व प्राचार्यांना यापूर्वीच दिल्या आहेत.
विद्यार्थी, प्राध्यापकांच्या लोकल प्रवासाचे काय?
कॉलेज सुरू करण्याविषयी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढलेल्या अध्यादेशाप्रमाणे आम्ही कार्यवाही करणार आहोत. कॉलेज सुरू करायची असल्यास विद्यापीठाने प्रशासनाची परवानगी घ्यावी. मुंबईत अजूनही पूर्ण वेळेत लोकल सुरू झालेल्या नाहीत. प्रॅक्टिकल परीक्षेसाठी जरी विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बोलावले तरी त्यांनी प्रवास कसा करायचा हा प्रश्नच आहे.
– डॉ. टी. ए. शिवारे, अध्यक्ष, नॉन गर्व्हर्न्मेंट कॉलेज, प्रिन्सिपल असोसिएशन































































