
डेहराडून जिल्ह्यातील नागघेर राणीपोखरी येथे एका पुजाऱ्याने आपल्या कुटुंबातील पाच जणांचा गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. महेश कुमार असे या आरोपीचे नाव असून त्याने त्याची आई, पत्नी आणि तीन मुलींची गळा चिरून हत्या केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच डेहराडूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिलीपसिंह कुंवर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पोलीस अधीक्षक, ग्रामीण व मंडळ अधिकारी डोईवाला यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीने बीतन देवी 75 वर्षे (आई), नीतू देवी 36 वर्षे (पत्नी), अपर्णा 13 वर्षे (मुलगी), अन्नपूर्णा 9 वर्षे (मुलगी) आणि स्वर्ण उर्फ गुलन 11 वर्षे (मुलगी) यांची गळा चिरून हत्या केली. आरोपीची आई मानसिक आजाराने त्रस्त होती, तर तिची एक मुलगी अपंग असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
























































