
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली आहे. दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. राहुल गांधींवरील कारवाई ही मोदी सरकारची ‘भीती’ असल्याचे त्यांनी म्हटले. ही राहुल गांधींची लढाई नाही, तर देश वाचवण्याची लढाई आहे. असे केजरीवाल म्हणाले.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी प्रथम दिल्ली विधानसभेच्या माध्यमातून आणि नंतर ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘राहुल गांधींची लोकसभेतून हकालपट्टी होणे हे धक्कादायक आहे. देश अत्यंत कठीण काळातून जात आहे. त्यांनी संपूर्ण देशाला घाबरवले आहे. त्यामुळे आता 130 कोटी जनतेला त्यांच्या अहंकारी सत्तेच्या विरोधात एकत्र यावे लागेल.’
विधानसभेत उपराज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘तुम्ही राहुल गांधींचे सदस्यत्व संपवले आहे. तुम्ही लोक भित्रे निघालेत. अशाने सरकार चालत नाही. तुमचा अहंकार सातव्या आकाशावर आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देश उद्ध्वस्त होत आहे. मी भाजपच्या सर्व लोकांना सांगू इच्छितो, ज्यांना देश नष्ट करायचा आहे त्यांनी भाजपमध्ये राहा आणि ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी भाजप सोडा.’
विधानसभेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की, ‘ज्या प्रकारे राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आणि 24 तासांच्या आत लोकसभेतून अपात्र ठरवले गेले, ही आपल्या देशासाठी चिंतेची बाब आहे. आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो. मात्र जो निर्णय घेण्यात आला त्याला आमचा पाठिंबा नाही. ज्या पद्धतीने सदस्यत्व संपुष्टात आले ते भ्याड कृत्य आहे. हे घाबरलेल्या सरकारचे लक्षण आहे. देशात जे काही चालू आहे ते अत्यंत धोकादायक आहे. देशाला वाचवायचे असेल तर 130 कोटी लोकांना एकत्र यावे लागेल. हा लढा राहुल गांधी किंवा काँग्रेसचा नसून, देशाला हुकूमशहापासून वाचवण्याची ही लढाई आहे.’




























































