Delhi Blast Case : आमिर राशिद अलीला 10 दिवसांची एनआयए कोठडी, कटकारस्थान रचल्याचा आरोप

दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आमिर राशिद अलीला कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला 10 दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे. आमिर राशिद अली हा आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीचा जवळचा सहकारी असल्याचे सांगितले जात आहे. आमिरवर या स्फोटाची कटकारस्थान रचल्याचा आरोप आहे.

दिल्लीतील कार स्फोटाची चौकशी एनआयए करत आहे. आतापर्यंतच्या तपासातून असे समोर आले आहे की जम्मू-काश्मीरमधील पंपोरच्या सबूराचा रहिवासी आणि कथित आरोपी आमिर राशिद यांच्या सोबत मिळूनच उमर नबीने हा हल्ला रचला होता. हल्ल्यात वापरण्यात आलेली कार खरेदी करण्यास आमिरनेच उमरला मदत केली होती. हीच कार मूव्हिंग आयईडी म्हणून वापरण्यात आली होती.

एनआयएने फॉरेन्सिक तपासणीतून आयईडी वाहणाऱ्या गाडीत मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीची ओळख उमर नबी म्हणून केली होती. यासाठी त्याचे डीएनए त्याच्या आईच्या डीएनएशी जुळवण्यात आले आणि ते शंभर टक्के जुळले. उमर नबी हा पुलवामाचा रहिवासी होता आणि हरियाणातील फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाच्या जनरल मेडिसिन विभागात प्राध्यापक होता.

आरोपी आमिर राशिद अली चौकशीत महत्त्वाचे खुलासे करू शकतो, त्यामुळेच त्याला 10 दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. एवढेच नाही, तर तपास यंत्रणांना उमर नबीची आणखी एक इकोस्पोर्ट्स कारही सापडली आहे. एनआयएने आमिर राशिद अलीला हल्ल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी दिल्लीमधून ताब्यात घेतले होते. मात्र, दीर्घ चौकशीनंतर त्याची भूमिका स्पष्ट झाल्यावर त्याला अटक करण्यात आली.