बुराडीकांडचे गूढ उकलले, दिल्ली पोलिसांचा खळबळजनक खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

संपूर्ण देशात खळबळ माजवणाऱ्या नवी दिल्लीतील बुराडी हत्याकांड प्रकरणी दिल्ली पोलिसांनी नव्याने खळबळजनक खुलासा केला आहे. हे हत्याकांड आत्महत्येचा प्रकार नसून एक अपघात आहे. असे पोलिसांनी म्हटले आहे. या हत्याकांडातील 11 जणांची मानसिक अवस्था तपासण्यासाठी त्यांच्या मृतदेहाची सायकोलॉजिकल अॅटोप्सी करण्यात आली होती. त्यात या हत्याकांडातील कोणत्याही व्यक्तीला ही पूजा केल्यानंतर आपला मृत्यू होईल हे माहित नव्हते असे निदर्शनास आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

30 जून रोजी मध्यरात्री नवी दिल्लीतील बुराडी येथे एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले होते. या हत्याकांडामागे आत्महत्येबरोबरच घातपाताचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला होता. घटनास्थळी पोलिसांना एक डायरीही सापडली होती. त्यात तंत्र, मंत्र व पूजा विधीबरोबरच या कुटुंबातील ललित नावाची व्यक्ती त्याच्या मृत वडिलांबरोबर संवाद साधत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणात अनेकवेळा वेगवेगळे खुलासेही केले. पण आता 11 मृतदेहाच्या सायकोलॉजिकल अॅटोप्सी अहवालात हे हत्याकांड अपघात असल्याचे समोर आल्याने आता या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे.