कार्तिक, मॉर्गन, रसेलनंतर फलंदाजीला यायला हवे, गौतम गंभीरचे उद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली कॅपिटल्सकडून शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाला सामोरे जावे लागले. फक्त 18 धावांनी त्यांची हार झाली. याप्रसंगी ओएन मॉर्गन (44 धावा) व राहुल त्रिपाठी (36 धावा) यांची झुंज अपयशी ठरली. हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने कोलकाता नाईट रायडर्सच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली.

तो म्हणाला, ओएन मॉर्गन व आंद्रे रसेल यांनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवे. त्यानंतर कर्णधार दिनेश कार्तिकने फलंदाजी करायला हवी.गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवलीय. त्यामुळे या संघाशी त्याचे जिव्हाळ्याचे नाते आहे. यामुळे या पराभवानंतर तो म्हणाला, राहुल त्रिपाठीला सलामीला पाठवायला हवे. तसेच ओएन मॉर्गनने चौथ्या आणि आंद्रे रसेल याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी. दिनेश कार्तिकने सहाव्या स्थानावर फलंदाजी करून सुनील नारायणला सातव्या किंवा आठव्या स्थानावर फलंदाजीला आणायला हवे, असे त्याला वाटते.

माझ्याकडे नैसर्गिक गुणवत्ता नाहीए – श्रेयस अय्यर
मुंबईकर श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्ससाठी मोलाची कामगिरी करतोय. नेतृत्वासोबतच फलंदाज म्हणूनही त्याने आपला ठसा उमटवलाय. शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या लढतीत त्याने अवघ्या 38 चेंडूंत नाबाद 88 धावा तडकावल्या. याप्रसंगी तो म्हणाला, माझ्याकडे नैसर्गिक गुणवत्ता नाहीए. मेहनत व स्मार्ट वर्कच्या जोरावर मी पुढे जात आहे. जिममध्येही कसून मेहनत करतोय.