दिल्ली डायरी – शेतकरी आंदोलनाने बदललेले हरयाणातील ‘वारे’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निलेश कुलकर्णी

दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीतही शेतकऱयांनी चाळीस दिवसांपासून आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्याचे राजकीय फटके भारतीय जनता पक्षाला हरयाणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसले आहेत. ज्या ‘सिंधू बॉर्डर’वर शेतकऱयांचे हे आंदोलन सुरू आहे. तेथील जनतेने भाजपचा स्थानिक निवडणुकीत दारुण पराभव केला आहे. हरयाणातले हे ‘बदलाचे वारे’ हिमालयाच्या शीत लहरींसोबत देशभर पसरायला वेळ लागणार नाही. तेव्हा केंद्रातील राज्यकर्त्या पक्षाने वेळीच सावध झालेले बरे!

हरयाणामधील महापालिका निवडणुकीत जनतेने सोनिपत, धारुहेडा यांसह दोन महानगरपालिका व तीन नगर परिषदांमध्ये भाजपचा धुव्वा उडवला. अपघाताने हरयाणाचे उपमुख्यमंत्री बनलेल्या जेजेपीच्या दुष्यंत चौटाला यांनाही जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे. हे आंदोलन सुरू झाल्यापासून ते कसे मोडीत काढता येईल, यात हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा बहुतांश वेळ जात आहे. खट्टरांचा शेतकऱयांनी जिथे जातील तिथे निषेध केला. चौटालांचे तर हॅलिपॅड संतप्त शेतकऱयांनी उखडून टाकले होते. जागोजाग भाजप पुढाऱयांना शेतकरी घेराव घालत होते. हे सगळे स्वयंस्फूर्त असताना भाजपवाले हे सर्व खलिस्तानी पुरस्पृत आहे असा दावा करत आंदोलन बदनाम करत होते. त्याचा फटका सत्तारूढ पक्षाला बसला आहे. कृषी कायद्यावरून हरयाणातल्या अपक्ष आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली असून चौटालांच्या आमदारांनी तर खट्टर सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठी दबाव वाढविला आहे. केवळ पंतप्रधानांचे मित्र या भरवशावर ज्याप्रमाणे खट्टर अपघाताने हरयाणाचे मुख्यमंत्री बनले तसेच दुष्यंत चौटालाही केवळ नशिबाने उपमुख्यमंत्री बनले. भाजपला बहुमत मिळाले नाही आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या दुष्यंत चौटालांचे वडील अजय यांना बाहेर काढण्याच्या ‘डील’मधून हे सरकार बनले. आता शेतकरी आंदोलनाने या सरकारची घटिका भरत आणली आहे. या आंदोलनामुळे थंड पडलेल्या काँग्रेस पक्षाला त्या राज्यात तरतरी आली आहे, तर काही ठिकाणी जनतेने भाजप नको म्हणून अपक्षांना संधी दिली आहे. हरयाणातले हे ‘बदलाचे वारे’ हिमालयाच्या शीत लहरींसोबत देशभर पसरायला वेळ लागणार नाही. तेव्हा केंद्रातील राज्यकर्त्या पक्षाने वेळीच सावध झालेले बरे!

मनसुखभाईंचे मनपरिवर्तन

गुजरातमधले भाजपचे ज्येष्ठ आदिवासी खासदार मनसुखभाई वसावा यांनी पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यशैलीवर नाराज होऊन खासदारकीचा राजीनामा देऊ केला. देशातल्या सर्वशक्तिमान अशा दोन नेत्यांविरोधात उघडपणे वसावांनी बंडाचा झेंडा फडकविल्याने ते सगळीकडे फेमस झाले, मात्र वसावांचा ‘बंडोबा’ भाजपने लगेचच ‘थंडोबा’ केल्याने मनसुखभाईंच्या मनपरिवर्तनाबद्दल खुमासदार कहाण्या आता रंगू लागल्या आहेत. सहा वेळा खासदार व एकदा केंद्रात मंत्री राहिलेल्या वसावा यांच्या भरूच मतदारसंघात सध्या इको सेन्सिटिव्ह झोनचा मुद्दा गाजत आहे. लोकभावना व खासदारांच्या भावनांचा विचार न करता काम सुरू असल्याने नाराज झालेल्या वसावांनी तब्येतीच्या कारणामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे खळबळ उडाली खरी, मात्र गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची भेट घेतल्यानंतर वसावा यांचे मतपरिवर्तन झाले आणि त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला. त्यासाठी वसावा यांनी दिलेली कारणे तितकीच मनोरंजक आहेत. ‘खासदार राहिलो तरच माझ्या गळ्याच्या व कमरेच्या आजाराचा खर्च मोफत होईल’, असे मला केंद्रीय नेतृत्वाने लक्षात आणून दिल्यामुळे मी राजीनामा मागे घेत आहे. आता हे कारण सांगून वसावा यांनी जनतेची फुकटात करमणूक केली आहे. वसावा यांच्या रोगाचे फुकटात जे काही व्हायचे ते इलाज होतील, मात्र गुजरातसारख्या गृहराज्यातून भाजपला बंडखोरीच्या नव्या रोगाची लागण होते की काय, अशी स्थिती वसावांच्या मनपरिवर्तनामुळे निर्माण झाली आहे.

‘नवे संकटमोचक’

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व आयुष्यात फक्त एकदा लोकसभा निवडणूक हरलेल्या कमलनाथ यांनी आता या राजकारणात मन रमत नाही, असे सांगून निवृत्तीचे संकेत दिल्यामुळे मध्यंतरी मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली होती. देशात कोरोना घुसला आणि मध्य प्रदेशात भाजपच्या सत्ताकांक्षेच्या व्हायरसने कमलनाथांची खुर्ची घालवली. पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव होईल व आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ, अशी कमलनाथांची आशाही फोल ठरली. अहमद पटेल व मोतीलाल व्होरा यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या निधनामुळे काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या राजकारणातली ही ‘स्पेस’ भरून काढण्यासाठी अनेकजण खटपटी करत आहेत. निवृत्तीची भाषा करणारे कमलनाथ खरेच तशी विरक्ती स्वीकारतात की काय, असे वाटत असतानाच काँग्रेसच्या 23 पत्रप्रपंच करणाऱया नेत्यांशी सोनिया गांधींनी चर्चा करावी यासाठी कमलनाथांनी मध्यंतरी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारामुळे ही बैठकही झाली. त्यामुळे कमलनाथ यांचा राजकीय भाव सध्या दिल्लीच्या राजकारणात चांगलाच वधारला आहे. गांधी घराण्याशी एकनिष्ठ असणे व अनुभवी असणे या जोरावर कमलनाथ आता निवृत्तीचा निव्वळ फुगा सोडून नवी इनिंग खेळण्याच्या तयारीत दिसत आहेत. प्रणब मुखर्जी एकेकाळी काँग्रेसचे संकटमोचक असायचे. नंतरच्या काळात अहमद पटेलांनी ती भूमिका अनेक वर्षे पार पाडली. आता मध्य प्रदेशच्या राजकारणात फारशा ‘होप्स’ राहिलेल्या नसल्यामुळे कमलनाथ राष्ट्रीय राजकारणात काँगेसचे संकटमोचक ठरतील काय, असा सवाल विचारला जात आहे. राजकारणात निवृत्तीचे वय नसतेच, मात्र तसे फुगे अधूनमधून सोडावे लागत असतात. कमलनाथांनी तीच फुगेबाजी केली आहे.