दिल्ली डायरी – चंबळमधील पोटनिवडणुकांचे ‘तुंबळ’ युद्ध…!

>> नीलेश कुलकर्णी

मध्य प्रदेशात होऊ घातलेल्या 28 विधानसभांच्या पोटनिवडणुकांना केवळ राज्य पातळीवरच नाही तर राष्ट्रीय पातळीवरही महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत कोणत्याही स्थितीत किमान 9 जागा जिंकणे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासाठी ‘नाक का सवाल’ आहे. त्यात ते अपयशी ठरले तर कोरोना काळात सत्तेत आलेले त्यांचे सरकार कोरोना जायच्या आतच पायउतार होण्याची भीती आहे. भाजपवासी झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासाठीदेखील ही मोठी परीक्षा आहे. चंबळच्या खोऱयात दोन राजकीय पक्षांत आणि पक्षांतर्गत मोठी धुमश्चक्री होणार आहे. त्याचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावरही उमटणार असल्याने सध्या चंबळमधील ‘तुंबळ युद्धा’कडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

एखाद्या राज्यातील पोटनिवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सहसा दिसून येत नाही. मात्र, ज्योतिरादित्य शिंदे भाजपवासी झाल्यामुळे मध्य प्रदेशात होऊ घातलेल्या 28 विधानसभांच्या पोटनिवडणुकांना केवळ राज्य पातळीवरच नाही तर राष्ट्रीय पातळीवरही महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत कोणत्याही स्थितीत किमान 9 जागा जिंकणे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासाठी ‘नाक का सवाल’ आहे. त्यात ते अपयशी ठरले तर कोरोना काळात सत्तेत आलेले त्यांचे सरकार कोरोना जायच्या आतच पायउतार होण्याची भीती आहे. 28 पैकी खूप कमी जागांवर भाजपला कौल मिळाला तरीही शिवराज यांची गच्छंती होण्याची चिन्हे आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासाठीदेखील ही मोठी परीक्षा आहे. वाजतगाजत त्यांच्या हाती भाजपने कमळ दिले आहे. तरी त्यांचा राज्यव्यापी प्रभाव नाही. ग्वाल्हेर व चंबळच्या खोऱयातच शिंदे समर्थकांना निवडणुकीचा प्रचार करताना नाकीनऊ येत आहेत. त्यातच राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्यासोबतची ‘डील’ फिस्कटल्याने शिंदे यांच्यावर भाजपचे हायकमांड नाराज आहे. अशा स्थितीत आपल्या 24 समर्थकांपैकी किती जणांना शिंदे पुन्हा निवडून आणतात यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल.

दुसरीकडे ‘कानामागून आले तिखट झाले’ असे शिंदे डोईजड ठरू नयेत यासाठी राज्यातले भाजप नेते सरसावले आहेत. काँग्रेस कधी नव्हे ती एकसंध आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. मध्य प्रदेशात पुन्हा काँग्रेसच सत्तेवर येणार असा प्रचार सध्या तापू लागला आहे. शिंदेंयांसोबत काँग्रेस का सोडली, या प्रश्नाचे उत्तर जनतेला देता देता शिंदे समर्थक उमेदवारांना घाम फुटत आहे तर भाजपचे मूळ केडर या ‘उपऱया’ उमेदवारांसाठी काम करायला तयार नाही. अशा परिस्थितीत मध्य प्रदेशात रोचक मुकाबला होणार आहे. बहुमताचा आकडा इकडे तिकडे फिरला तरी नरोत्तम मिश्रांना मुख्यमंत्रीपदासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या ‘पोटा’त काय दडले आहे, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

कोरोना काळात मध्य प्रदेशात साम-दाम-दंड-भेदाने भाजपने सरकार बनवले. त्यावेळीही भाजपच्या चाणक्यांना शिवराजसिंग यांना मुळीच मुख्यमंत्री करायचे नव्हते, मात्र कोरोनाची परिस्थिती आणि बहुसंख्य आमदारांचा कल म्हणून नाइलाजाने शिवराज यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवावे लागले. कोरोनाच्या स्थितीचा अचूक फायदा उचलत शिवराज यांनीही नरोत्तम मिश्रांच्या तोंडाशी आलेला मुख्यमंत्रीपदाचा घास हिरावून घेतला होता. त्याचे उट्टे काढण्यासाठी आता भाजप श्रेष्ठी ‘टायमिंग’च्या शोधात आहेत. बिहारच्या निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यात भाजपशासित काही राज्यांतील मुख्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात आणण्याची एक योजना दिल्लीदरबारी शिजत आहे. त्याची पहिली शिकार शिवराज असतील असे बोलले जात आहे. 28 जागा जिंकण्याचे आव्हान भाजपपुढे असताना शिवराज व ज्योतिरादित्य यांच्यात एकवाक्यता नाही. शिंदे समर्थकांना ‘आपले’ समजण्यास अजूनही भाजप कार्यकर्ते तयार नाहीत अशी गोंधळलेली स्थिती भाजपच्या गोटात असताना तिकडे काँग्रेसमध्ये मात्र कधी नव्हे ती एकवाक्यता दिसून येत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचे तुणतुणे बाजूला फेकून ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चा नारा दिल्याने भाजपची चांगलीच गोची झाली आहे. राममंदिर भूमिपूजनावेळी राज्यातील काँग्रेस कार्यालय रोषणाईने उजळून गेले होते. मिठाई वाटली गेली. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुंदरकांड आणि हनुमानचालिसाचा नुसता धडाकाच लावला आहे. पोटनिवडणुका मंगळवारीच जाहीर झाल्या. त्यामुळे हनुमानजी कमलनाथ यांच्यावर बेहद प्रसन्न आहेत, असा प्रचार काँग्रेसने सुरू केला आहे. चंबळच्या खोऱयात दोन राजकीय पक्षांत आणि पक्षांतर्गत मोठी धुमश्चक्री होणार आहे. त्याचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावरही उमटणार असल्याने सध्या चंबळमधील ‘तुंबळ युद्धा’कडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

अजातशत्रू

बिहारची विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच रामविलास पासवान यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचे निधन व्हावे, यासारखे दुर्दैव ते कोणते? बाबू जगजीवनराम यांच्यानंतरचा सर्वात मोठा दलित नेता, असे पासवान यांचे वर्णन केले जाते ते त्यांच्या कार्यशैलीमुळे. सरकार कोणाचेही असो पासवान त्यात हमखास मंत्री असायचे. राजकारणात वाऱयाची दिशा कोणत्या बाजूला आहे याचे अचूक भान आणि त्यासाठीचा समंजसपणा अंगी असल्यामुळे पासवान हे व्ही. पी. सिंग यांच्यापासून ते मनमोहन सिंग, वाजपेयी, नरेंद्र मोदी अशा विविध विचारांच्या विविधांगी सरकारांमध्ये कायमच मंत्री म्हणून कार्यरत राहिले. जयप्रकाश नारायण यांचे बोट पकडून ते संपूर्ण क्रांती आंदोलनातून राजकारणात पुढे आले आणि यशोशिखर चढतच गेले. विक्रमी मताधिक्याने जिंकून येण्याचा त्यांचा विक्रम ‘गिनीज बुक’मध्ये नोंदला गेला. बिहार आणि हाजीपूर या आपल्या मतदारसंघावर या नेत्याचे निस्सीम प्रेम होते. दलित नेता अशी त्यांची प्रतिमा केली जात असली तरी ते सर्वाथाने सर्वजनांचे नेते होते. आपल्याकडे आलेल्या माणसाला शक्य ती मदत करावी हा ‘माणुसकी धर्म’ त्यांनी कायम राखला. त्यामुळेच ते मोठे ‘मासलीडर’ बनले. दिल्लीचे राजकारण गाजविणाऱया पासवानांना जेपींच्या लालू यादव, नितीशकुमार या शिष्योत्तमाप्रमाणे बिहारचे मुख्यमंत्रीपद मात्र भूषवता आले नाही. मात्र त्याची फारशी खंत न बाळगता रामविलास पासवान सतत कार्यरत राहिले. जनता दलातून बाहेर पडून त्यांनी 2000 मध्ये लोकजनशक्ती पक्ष स्थापन केला. त्यामुळे एका अर्थाने त्यांच्या राजकारणाला मर्यादा पडल्या. पासवानांसारख्या समंजस नेत्याला राष्ट्रीय पक्षाचा ‘प्लॅटफार्म’ मिळाला असता तर त्यांनी कदाचित यापेक्षाही मोठी झेप घेतली असती. नियतीला कदाचित ते मान्य नसावे. ज्या जेपींचे बोट धरून ते राजकारणात आले त्या जेपींच्या पुण्यतिथीदिवशीच त्यांचे शिष्योत्तम रामविलास पासवानही स्वर्गस्थ झाले हा योगायोगच म्हणावा लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या