
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिमालय पर्वतरागांच्या क्षेत्रात आगामी काळात जास्त तीव्रतेच्या भूकंप येण्याची शक्यता भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. हिमालय पर्वतरांगांच्या क्षेत्रात जमिनीखाली झपाट्याने बदल होत आहे. भूप्रस्तारांमध्ये आकर्षणाची प्रक्रिया सुरू आहे. भूगर्भातील या हालचालींमुळे हिमालयाच्या क्षेत्रात आणि विशेष करून राजधानी नवी दिल्लीत 8.5 किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप येण्याची शक्यता भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या याबाबतच्या अभ्यासातून संशोधकांनी व्यक्त केलेल्या या शक्यतेला दुजोरा दिला आहे. दिल्ली हे भूकंपासाठी अतिशय संवेदनशील क्षेत्रात आहे.
1315 आणि 1440 या काळात हिमालय क्षेत्रात झालेल्या भूकंपाच्या घटनेनंतर हा भाग शांत होता. मात्र, आता भूगर्भातील हालचाली वाढल्या आहेत. हिमालयातील प्रस्तर उत्तर हिंदुस्थानातील प्रस्तरांना आकर्षित करत आहेत, असे बंगळुरुतील जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडवान्स साइंटिफिक रिसर्चचे वैज्ञानिक सी. पी. राजेंद्रन यांनी सांगितले. तसेच राजधानी दिल्लीचे क्षेत्र भूकंपाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. भूगर्भातील हालचाली अशाच सुरू राहिल्या तर राजधानी दिल्लीला सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. भूगर्भातील या हालचालीमुळे दिल्लीला मोठ्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसू शकतो. त्यात शहरातील फक्तच 20 टक्केच इमारती वाचू शकतील असा इशाराही वैज्ञनिकांनी दिला आहे. दिल्ली शहर तीन फाल्ट लाइन म्हणजेच प्रस्तरांवर वसले आहे. त्यात सोहना, मथुरा आणि दिल्ली मुरादाबाद या तीन फॉल्ट लाईन आहेत. गुरुग्राम शहराजवळ सात फॉल्ट लाइन असल्याने हे शहर सर्वात संवेदनशील असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.
2001 मध्ये गुजरातच्या भूजमध्ये आलेल्या भूकंपानंतर दिल्लीची विभागणी तीन विभागात करण्यात आली आहे. मात्र, काही इमारती अनेक वर्षापूर्वीच्या असून शहराची रचना बदलण्यासाठी फारसा वाव नसल्याचे संस्थेचे संस्थापक मानित रस्तोगी यांनी सांगितले. सध्याच्या स्थितीचा विचार करता दिल्लीतील फक्त 10 टक्के इमारतीच भूकपांचा सामना करण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. 2008 मध्ये दिल्लीतील काही इमारतींची दुरुस्ती करण्यात आली आहे. 2015 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर दिल्ली सचिवालय, दिल्ली पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्यालय,लडलॉ कॅसल शाळा, विकासभवन, गुरु तेग बहादूर रुग्णालय आणि विभागीय प्रशासनाच्या इमारतींची दुरुस्ती करून त्या अधिक मजबूत करण्यात आल्या आहेत. दिल्ली सरकारच्या अनेक प्रशासकीय इमारती भूकंपप्रवण क्षेत्रात येतात. त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांची नियमित देखभाल दुरुस्ती करण्यात येते, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले.
यमुना नदीच्या परिसरातील काही भागानांही भूकंपाचा धोका आहे. त्यात पूर्व दिल्लीतील अनेक निवासी भागांचा समावेश आहे. दिल्लीतील लुटियन्स भाग, सरिता विहार, पश्चिम विहार, वजीराबाद, करोल बाग आणि जनकपुरी भागांना सर्वाधिक धोका आहे. तर जेएनयू, एम्स,छतरपूर, नारायणा आणि वसंतकुंज हे भाग भूकंपाचा मुकाबला करण्यास सक्षम असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.






























































