लेख – अर्थव्यवस्थेचा ‘पेशंट’ कसा तरणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी

यूपीए सरकार 2014 मध्ये पायउतार झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था भ्रष्टाचारच्या आणि मंदीबाईच्या फेऱयात असूनही बऱयाच पैकी मजबूत होती. मात्र 2014 आणि 2019 मध्ये संपूर्ण बहुमताचे मोदी सरकार केंद्रात येऊनही अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीत सुधारणा झालीच नाही. उलट आधी नोटबंदी, नंतर जीएसटी आणि इतर धोरणात्मक चुकांचा तडाखा बसल्याने हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचा ‘पेशंट’ अधिकच विकलांग झाला. त्यात आता कोरोनाच्या जागतिक संकटाची त्सुनामी आदळली. त्यामुळे हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचा ‘पेशंट’ कसा तरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशात 2014 मध्ये ऐतिहासिक सत्तांतर झाले तेव्हा तत्कालीन यूपीए सरकारच्या धोरण लकव्याने अर्थव्यवस्थाची हालत नाजूक होती. त्यामुळे संपूर्ण बहुमताने सत्तेवर आलेले मोदी सरकार अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणले अशी जनतेची अपेक्षाची होती. मात्र आधी 2014 आणि नंतर 2019 अशी सलग दोनदा सत्ता प्राप्त होऊनही अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीत भाजप सरकारला सुधारणा करता आली नाही. उलट नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयांनी अर्थव्यवस्थेची अवस्था आगीतून फुफाटय़ात अशी केली. त्यात केंद्रातील सत्ताधाऱयांचे धोरण हम करे सो असे असल्याने अर्थव्यवस्थेचे रुतलेले गाडे बाहेर कसे काढता येईल हे सांगणारे तज्ञ लोक देशद्रोही ठरवले गेले. त्या मंडळींनी हिंदुस्थानातून, सरकारी कारभारातून काढता पाय घेतला. त्यात आता कोरोनाच्या संकटाची भर पडली आहे. संपूर्ण जगाच्याच अर्थकारणाला त्याचा भयंकर तडाखा बसला आहे. हिंदुस्थानी अर्थव्यवस्था ही त्यातून सुटलेली नाही. त्यामुळे आधीच धडपणारी आपली अर्थव्यवस्था अंधारातच चाचपडताना दिसत आहे.

कोरोनाने स्वंयपूर्ण होण्याचे शिकवले असे पंतप्रधान मोदी नुकतेच म्हणाले. ते स्वयंपूर्ण वगैरे ठीक आहे, पण लॉक डाऊननंतर लोकांनी पोटाचे काय, रोजगाराचे काय? यावर पंतप्रधान काही बोलले नाहीत. देशाचा जीडीपी `डबल डिजिट’मध्ये नेणार अशा घोषणा ऐकून जनतेचा आता भ्रमनिरास झाला आहे. उलट जीडीपी पूर्णांकात येण्याची भीती वर्तवली जात आहे. सीआयआयने जीडीपी 1.5 टक्के इतका राहील असा अंदाज वर्तवला आहे, तर आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी ‘फिच’ने जीडीपीचा विकास दर 0.8 टक्के राहण्याची भीती व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाने (आयएमएफ)नेदेखील जीडीपी 1.9 टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक बॅंकेने हाच दर 1.5 टक्के राहील असे म्हटले आहे, तर ‘मूडीज’ने तो दोन टक्क्यांपर्यंत असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. लॉक डाऊनच्या काळात `कंझ्युमर केड्रिट सायकल’ ठप्प झाल्याने हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेची वाट लागेल, अशी भीती अर्थतज्ञ क्रिस वूड यांनी वर्तवली आहे. जागतिक दर्जाच्या संस्था आणि विद्वानांनी हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेची अशी करुण कहाणी वर्तवली असली तरी ती भक्तमंडळींच्या पचनी पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळेच चीनची कोंडी करून हिंदुस्थान कसा जागतिक बाजारावर वर्चस्व गाजवणार वगैरेच्या पोस्ट पेरल्या जात आहेत. अर्थात, त्यामुळे अर्थव्यवस्थेचा झाकला गेलेला कोंबडा आरवणार नाही ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. लॉक डाऊननंतर सरकारची खरी कसोटी लागणार आहे. देशाची एक चर्तुथांश लोकसंख्या बेरोजगार होण्याची भीती आहे. या सर्वात मोठय़ा प्रश्नाचे उत्तर टाळ्या आणि थाळ्या वाजवून मिळणार नाही. लाकॅ डाऊनच्या काळात सरकारने गरिबांची पुरेशी काळजी न घेतल्याबद्दल नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनीही सरकारचे कान पिरगळले आहेत. अर्थात, त्यामुळे गरिबांच्या वेदना सरकारच्या कानात शिरतील असे नाही. त्यामुळे कोरोनाचा इव्हेंट झाला असेल तर सरकारने देश आणि अर्थव्यवस्था वाचवायच्या कामाला लागायला हवे!

मांझी यांचे लॉक डाऊन
संपूर्ण देश लॉक डाऊनमुळे ठप्प असला तरी हिंदुस्थानात व्हीआयपी संस्कृतीचे `शटर’ खाली आलेले नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा प्रवास. या जीतनराम मांझी यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द फारशी लक्षात ठेवण्याजोगी नाही. तरीही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आलेल्या आंब्यांवरून मांझी आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात त्यावेळी चांगलीच जुंपली होती. त्यामुळे हे मांझी थोडेफार तरी लोकांच्या स्मरणात राहिले. नितीशकुमार यांना धोबीपछाड देण्यासाठी भाजपने मांझी यांना पुढे केले. आता भाजपशी फारकत घेऊन त्यांनी वेगळा पक्ष काढला. हे मांझी नुकतेच चर्चेत आले ते त्यांनी त्यांच्या ताफ्यासह केलेल्या शाही प्रवासाने. लॉक डाऊनच्या काळात मांझी यांनी गया ते पटना असा शंभरेक कि.मी.चा प्रवास सात गाडय़ांच्या ताफ्यासह केला. ‘व्हीआयपी मूव्हमेंट’ अचानक सुरू झाल्याने प्रशासनाचीही तारांबळ उडाली. लॉक डाऊनचे सगळे नियम धाब्यावर बसवून सात गाडय़ांमध्ये मांझी समर्थक पाटण्यात पोहोचले. मांझी यांच्या या करामतीची `ब्रेकिंग न्यूज’ सुरू झाल्यावर मात्र त्यांची चांगलीच तंतरली. मीडियावाले फारच बातमी चालवत आहेत असे दिसल्यावर मांझी यांनी `आप आम आदमी और हममे कुछ फरक करेंगे या नही’, असा प्रतिसवाल मीडियालाच केला. `विधानसभा अध्यक्ष के बुलावे पर हमें आना पडा’, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र लॉक डाऊनमुळे हे महाशय लोकांसमोर पुन्हा आले हेही नसे थोडके.

आजी-माजींचा फायदा-तोटा
लॉक डाऊनच्या फायदा-तोटय़ाच्या अनेक गोष्टी सध्या सोशल मीडियावर विनोदी अंगाने धुमाकूळ घालत आहे. मात्र त्याच वेळी लॉक डाऊन एखाद्याला कसे फायदेशीर ठरू शकते हे पहायचे असेल तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे पाहावे लागेल. देशात कोरोनाचा शिरकाव होत असताना मध्य प्रदेशात भाजपने साम, दाम, दंड, भेदाचा वापर करत सत्तेत शिरकाव केला. कमलनाथ यांचे सरकार गडगडले आणि घाईगडबडीत शिवराजसिंग चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान झाले. कोरोनामुळे त्यांना मंत्रिमंडळाचा शपथविधीही करता आला नाही. तो नुकताच त्यांनी मास्क न लावता उरकून घेतला. मात्र या सगळ्यांत कमलनाथ यांचा लॉक डाऊनमुळे एक फायदा झाला तो मुख्यमंत्री निवासाचा. शिवराजसिंह चौहान यांचा शपथविधी झाला खरा, पण लगेचच लॉक डाऊनची घोषणा झाली. त्यामुळे शिवराज यांना मुख्यमंत्री निवासस्थानी `शिफ्ट’ होता आले नाही आणि कमलनाथ यांनाही तो बंगला सोडता आला नाही. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर शिवराज औपचारिक भेटीसाठी कमलनाथ यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेले तेवढेच काय ते `बंगल्याचे सुख’ त्यांच्या नशिबी आले. सध्या शिवराज आपल्या स्वत:च्या घरातून राज्याचा कारभार हाकत आहेत, तर मुख्यमंत्रीपद गेलेले कमलनाथ मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यात आराम करत शिवराज सरकारची कशी तारांबळ उडाली आहे हे पाहत आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांना फोडून कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची भाजपने बळकावली असली तरी मुख्यमंत्री निवासस्थान अजून तरी भाजपला परत मिळवता आले नाही. लॉक डाऊनचा असाही फायदा-तोटा शिवराज आणि कमलनाथ हे आजी-माजी मुख्यमंत्री अनुभवत आहेत.