दिल्ली डायरी – ‘गुपकार गँग’ची देशद्रोही बकबक

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

जम्मू-कश्मीरचे 370 कलम रद्द करण्याच्या ऐतिहासिक गोष्टीला आता जवळपास एक वर्ष होत आले आहे. मात्र त्यावेळी जी आश्वासने केंद्र सरकारने दिली होती ती अद्यापि तशीच रखडली आहेत. त्यात अब्दुल्ला पिता-पुत्र आणि मेहबुबा मुफ्ती हे राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले ‘गुपकार’ समझोत्याच्या नावाखाली एकत्र भेटले आणि त्यांनी कश्मीरमध्ये 370 कलम पुन्हा लागू करावे, कश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा परत द्यावा अशी एकत्रित बांग ठोकली. आंदोलनाचा इशाराही दिला. त्याचा राजकीय लाभ कदाचित भाजपला होईल, पण त्यापेक्षा देशहित महत्त्वाचे आहे. त्यामुळे या ‘गुपकार’ गँगची देशद्रोही बकबक आधी केंद्राने बंद करणे गरजेचे आहे.

जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 आणि 35 ए कलम रद्द करून केंद्र सरकारने राष्ट्रहिताचे एक मोठे पाऊल उचलले होते. आता त्याला वर्ष उलटून गेले आहे. जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. कश्मिरी पंडितांना परत आणू असे आश्वासन सरकारने दिले होते, त्या पातळीवर काहीच हालचाल झाली नाही. जम्मू-कश्मीरचे विभाजन झाल्यानंतर तिथे विकासाची गंगोत्री भरून वाहील असे चित्र निर्माण करण्यात आले होते. प्रत्यक्षात तसे काही घडलेले नाही. मात्र जम्मू-कश्मीरला दिलेली आश्वासने केंद्रातील राज्यकर्त्यांनी आता तरी गांभीर्याने घ्यावी अशा घटना सध्या घडत आहेत. स्थानबद्धतेमधून मुक्त झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला व ओमर अब्दुल्ला यांनी आता पाकिस्तान आणि चीनच्या दाढय़ा कुरवाळण्याचा नवा उद्योग आरंभला आहे. भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री राहिलेल्या मेहबुबा मुफ्तींनीही या कार्यक्रमात जोमाने सहभाग नोंदवला आहे. ही कट्टर विरोधी मंडळी ‘गुपकार समझोत्या’च्या नावाने नुकतीच एकमेकांना भेटली आणि कलम 370 पुन्हा लागू करावे, जम्मू-कश्मीर व लडाखचे विभाजन रद्द करून प्रदेशाला पुन्हा संपूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, अशा मागण्या केल्या. त्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा गँग’ने दिला आहे.

जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द झाल्यापासून नॅशनल कॉन्फरन्सचे अब्दुल्ला पितापुत्र आणि पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती एका अर्थाने ‘राजकीय बेरोजगार’ झाले आहेत. पाकिस्तानची भीती दाखवून जम्मू-कश्मीरच्या जनतेला वेठीस धरण्याचा उद्योग या दोन्ही घराण्यांनी वर्षानुवर्षे केला. त्याची अखेर झाल्यानंतर आता तरी जम्मू-कश्मीरमध्ये नवा अरुणोदय होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती, मात्र केंद्र सरकारला तिथे चमकदार कामगिरी करता आलेली नाही. कश्मिरी जनतेची रोजीरोटी ज्यावर अवलंबून आहे त्या पर्यटन उद्योगाला लागलेली घरघरही चिंताजनक आहे. कोरोनाने अडचणी अधिकच वाढवल्या आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अब्दुल्ला पितापुत्र व मेहबुबांनी पाकिस्तान आणि चीनची तळी उचलण्यास सुरुवात केली आहे. फारुख अब्दुल्लांनी तर देशविरोधी गरळ ओकण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. स्वायत्ततेचे तुणतुणे फारुख अब्दुल्ला 2000 पासूनच वाजवत आहेत. अब्दुल्ला आणि कंपनीची ही ‘बकबक’ राजकीयदृष्टय़ा भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. जम्मू-कश्मीरसह देशभरात हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणास ही बकबक पोषक ठरणार असली तरी देशहितासाठी ती पोषक नाही. त्यामुळे ‘गुपकार गँग’ला सरकारने लाईटली घेऊ नये. विशेषतः लडाखच्या सीमेवर चीन घुसखोरीसाठी टपून बसलेला असताना पक्षीय हित न पाहता सरकारने ‘गुपकार गँग’च्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. जम्मू-कश्मीरमध्ये कश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासह विकासाचे वारे वाहू लागले तर ‘गुपकार गँग’ला तेथील जनताच घरचा रस्ता दाखवेल.

उपकाराची परतफेड
राजकारणात वैयक्तिक आणि राजकीय संबंध सुदृढ ठेवण्याचे दीर्घकालिक राजकीय फायदे असतात. त्याची अनुभूती सध्या संयुक्त जनता दलातून बाहेर पडलेले नेते शरद यादव घेत आहेत. शरद यादवांचे राजकारण सध्या तसे उतरणीला लागले आहे. नितीशबाबूंशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी वेगळी चूल मांडून राजकारण करण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. जयप्रकाश नारायणांच्या तालमीत वगैरे तयार झाले असले तरी शरद यादवांनाही जेपींच्या अन्य शिष्यांप्रमाणे राजकीय घराणेशाहीचा आणि वारसदार नेमण्याचा मोह आवरता आलेला नाही. आपली मुलगी सुभाषिनीच्या राजकीय करीअरमुळे शरदबाबू चिंतेत पडले. एकेकाळचे राजकीय दुश्मन असलेल्या लालूंना त्यांनी सुभाषिनीला राष्ट्रीय जनता दलाकडून विधानसभेसाठी तिकीट देण्याची विनंती केली, मात्र धोरणी लालूंनी दाद दिली नाही. ना भाजपकडे मदत मागू शकत ना नितीशबाबूंसोबत जाऊ शकत असा पेच असताना शरदबाबूंनी काँग्रेसकडे मदत मागितली. त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर अहमद पटेलांनी हस्तक्षेप करत सुभाषिनीला नुसता काँग्रेस प्रवेशच दिला नाही, तर तिकीटही मिळवून दिले. 2017 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेलांना काहीही करून पराभूत करण्याचा विडाच अमित शहा यांनी उचलला होता. त्यावेळी गुजरातमध्ये असलेल्या संयुक्त जनता दलाच्या दोन आमदारांना अहमद पटेलांच्या बाजूने मतदान करण्यास शरद यादवांनी भाग पाडले होते. त्याचे पर्यवसान राज्यसभा जिंकून त्यावेळी अहमदमियां राजकारणातले ‘चाणक्य’ ठरले होते. शरदबाबूंनी केलेल्या या उपकाराची अहमदभाईंनी अशा रीतीने ‘परतफेड’ केली.

जरा जपून!
दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी नुकतेच कमळ हाती घेतले. सध्या दिसेल त्या इच्छुकाला पक्षामध्ये घेण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपने हाती घेतला आहे. तामिळनाडूत जम बसविण्याचा उद्देश त्यामागे आहे. खुशबू सुंदर यांना पक्षप्रवेश दिला. त्यासही वादविवादाचे ‘चार चांद’ लागले आहेत. नव्वदच्या दशकात या खुशबू दक्षिणेकडे इतक्या लोकप्रिय होत्या की, त्यांचे तिकडे मंदिर उभारले गेले. ‘मंदिर उभारले जाणारी पहिली अभिनेत्री’ हे बिरूद त्यांच्या मागे होते, मात्र आता त्या राजकारणात ‘अभिनय’ करू पाहत आहेत. काँग्रेसमध्येही मध्यंतरी त्या सक्रिय होत्या. आठवडाभरापूर्वीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती. मात्र ही टीका विसरून भाजपने त्यांना वाजतगाजत प्रवेश दिला. भाजपवासी झाल्या झाल्या खुशबू यांनी काँग्रेसला ‘मनोरुग्णांचा पक्ष’ अशी उपमा दिली होती. आठवडाभरापूर्वी मनोरुग्णांच्या पक्षात असलेल्या खुशबू आता भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत, मात्र काँग्रेसला मनोरुग्ण संबोधणे त्यांना महागात पडले. जागोजागी गुन्हे दाखल होऊ लागल्यावर त्यांनी अखेर या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून प्रकरण मिटवले. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे वागून चालत नाही एवढे जरी खुशबूंना समजले तरी पुरे!

आपली प्रतिक्रिया द्या