दिल्ली डायरी – भगवंत मान यांचा मास्टर स्ट्रोक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीलेश कुलकर्णी n [email protected]

आपल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पंजाबमध्ये पंचवीस हजार सरकारी नोकऱया देण्याचा निर्णय जाहीर करून पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी एक जोरकस सुरुवात केली आहे. मान हा निर्णय कसा अंमलात आणतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी जनतेला अत्यावश्यक असलेल्या पाणी, वीज, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात चांगले काम केले. त्यामुळे भाजपने देव पाण्यात ठेवले तरी दिल्ली त्यांना अजूनपर्यंत जिंकता आलेली नाही. भगवंत मान यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये मास्टर स्ट्रोक खेळला आहे. हा स्ट्रोक खणखणीत ठरला तर त्यांची वाटचाल दणदणीत ठरणार आहे हे नक्की.

बेरोजगारी हा या देशातील महागाई इतकाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. वर्षाकाठी पाच कोटी रोजगार देऊ, त्यानंतर दोन कोटी रोजगार देऊ अशी आश्वासनांची गाजरे तरुण वर्गाला दाखविली गेली होती मात्र साध्य काहीच झाले नाही. नोटाबंदी आणि त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे देशातील कोटय़वधी जणांचे रोजगार गेले. अशा सगळय़ा विदारक स्थितीमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान हे पंचवीस हजार सरकारी नोकऱयांचा निर्णय घेत असतील तर ते कौतुकास्पदच आहे. मुख्य म्हणजे किमान पहिले आश्वासन तरी त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण एरव्ही निवडणुका आल्या की भरमसाट आश्वासने द्यायची आणि नंतर विसरायचे हे नेहमीचेच राजकारण असते. त्यामुळे जनतेच्या राजकारण्यांकडून फारशा अपेक्षा नसण्याचे कारण म्हणजे निवडून आल्यानंतर या आश्वासनांना फासण्यात येणारा सोयिस्कर हरताळ! अरविंद केजरीवाल आणि त्यांचा ‘आप’ हा पक्षदेखील गाजरे दाखविण्यात कमी नाही, मात्र सामान्य जनतेच्या रोज मर्राच्या जीवनात ज्या बाबी आवश्यक आहेत. त्यावर केजरीवालांनी चांगले काम केले आहे. मुबलक दरात वीज, पाणी, दर्जेदार शिक्षण व चांगल्या आरोग्य सुविधा यामुळे नौटंकी करणारे राजकारणी असले तरी केजरीवाल दिल्लीकरांमध्ये लोकप्रिय ठरले.
‘आप’ची काम करण्याची पद्धत इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळेच पंजाबात आप सत्तेत आल्यानंतर काय होईल, याकडे देशाचे लक्ष आहे. पंजाब हे पाकिस्तानच्या सीमेनजीकचे अत्यंत संवेदनशील राज्य. त्यामुळेच ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या पंजाबला भगवंत मान ‘ड्रग्जमुक्त’ करतात काय हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयातून भगवंत मान यांनी चुणूक जरूर दाखवली आहे, मात्र त्यांना अजून बराच दूरचा पल्ला गाठायचा आहे. पंजाबची तिजोरी ओस पडली असून, एक लाख कोटीची मदत द्या, अशी मागणी मान यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. त्याचे काय होते बघूयात. पंजाबमध्ये आप सरकार कशी कामगिरी करते यावर राष्ट्रीय राजकारणातील या पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल. दिल्लीत मोदी-शहा आम्हाला काम करू देत नाहीत, ही ‘सोयिस्कर बोंब’ आप नेहमीच मारत असतो. मात्र पंजाबात ही बोंबाबोंब करण्याची संधी आपकडे नसेल.

‘भज्जी’चा ‘दुसरा’

क्रिकेटमध्ये ऑफ स्पिनचा ‘दुसरा’ टाकण्यात श्रीलंकेचा मुरलीधरन विख्यात होता. हरभजनसिंगनेही दुसरा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र क्रिकेटमध्ये रिटायरमेंटची ‘टायमिंग’ साधत भज्जीने राज्यसभेचा जो ‘दुसरा’ टाकला आहे त्याला तोड नाही. पंजाब निवडणुकीपूर्वी भज्जी क्रिकेटमधून रिटायर झाला. अर्थात त्याला आपल्या पक्षात ओढण्यासाठी अनेक नेत्यांची चढाओढ लागली होती, मात्र तापट डोक्याचा असूनही भज्जी शांत राहिला. नवज्योत सिद्धूंनी त्याला काँगेसमध्ये खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र सिद्धूच्या नादी लागणे म्हणजे ‘सर्वनाश’ हे कळण्याइतपत भज्जी सुज्ञ होता. त्यामुळे भाजप, काँगेसच्या नादी लागण्यापेक्षा त्याने शांत राहणे पसंत केले. त्याची बक्षिसी त्याला राज्यसभेच्या रूपाने मिळाली. ‘नशीब नशीब’ म्हणतात ते हेच! भज्जीचा हा दुसरा कितपत प्रभावी ठरतो ते यथावकाश कळेलच, मात्र भज्जीचा दुसरा सहकारी गौतम गंभीर लोकसभेत भाजपकडून ‘बॅटिंग’ करत असताना भज्जी ‘आप’च्या वतीने भाजपची राज्यसभेत ‘विकेट’ घेण्याचा प्रयत्न करेल, हे पाहणे मनोरंजक असेल. क्रिकेट व राजकारणाचे नाते तसे पूर्वापार आहे. भज्जीच्याच कालखंडातले मनोज तिवारी आणि अशोक डिंडा हे दोघेही सध्या पश्चिम बंगालमध्ये मंत्री आहेत.

शरद यादवांची कैफियत

राजकारणातील ‘मावळतीचा सूर्य’ काय असतो, याचा अनुभव सध्या ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव घेत आहेत. एकेकाळी देशातील दिग्गज राजकारण्यांमध्ये त्यांचा समावेश व्हायचा. नितीशबाबूंशी मतभेद झाल्यानंतर 2018 साली लोकतांत्रिक जनता दलाची स्थापना केली. अर्थात हा ‘कागदावरचाच पक्ष’. हा पक्ष त्यांनी लालू यादवांच्या राष्ट्रीय जनता दलामध्ये नुकताच विलीन केला. लालू व शरद यादवांचे तसे पाहिले तर राजकारणातले नाते विळ्याभोपळ्याचे, मात्र राजकारणातील आडवळणे तुम्हाला कोणत्या वळणावर आणून सोडतील याचा भरवसा नसतो. हल्ली लालूंची तब्येतही नाजूक, त्यात जेलवारी, हॉस्पिटल यांच्या चकरा. कौटुंबिक कलह यामुळे लालू पुरते ढेपाळले आहेत. लालू व शरद हे दोन्ही यादव महानायक जयप्रकाश नारायणांचे शिष्य. लालू तत्त्वशून्य तडजोडी करत पुढे केले. शरदबाबू जॉर्ज फर्नांडिसांचा तत्त्ववादी राजकारणाचा हात पकडून राहिले. जॉर्ज गेले. शरदबाबू राजकारणात मागे पडले. इतके की, दिल्लीत सध्या ज्या सरकारी बंगल्यात राहतात तो राहायला मिळण्यासाठी कोर्टाची लढाई त्यांना लढावी लागली. लालू यादवांचा पक्ष राज्यसभेवर आपल्याला किंवा कुटुंबातील कोणाला पाठवेल या आशावादावर पक्ष राष्ट्रीय जनता दलामध्ये विलीन करावा लागला. शरद यादवांच्या पक्षाचे रीतसर विलीनीकरण होत असताना मुकेश सहानी यांनी बिहार विधानसभेपूर्वी स्थापन केलेल्या ‘व्हीआयपी’ या पक्षाच्या तीन आमदारांनी पक्षाध्यक्षांना सोडून भाजपात प्रवेश केला आहे. साम-दाम-दंड-भेदाने ‘व्हीआयपी’चा फडशा एका फटक्यात पाडला हेच खरे.