
>> नीलेश कुलकर्णी
तामीळनाडूमध्ये अचानक राजकारण आणि वातावरण तापले आहे. तामीळनाडूमध्ये द्रमुकच्या एम. के. स्टॅलिन यांचे सरकार स्थिर आहे. तथापि, विरोधातील अण्णा द्रमुक पक्षात मोठय़ा उलथापालथी घडून येत आहेत. जयललितांच्या खास मैत्रीण शशिकला ऊर्फ चिन्नम्मा या आता ‘बाहेर’ आल्याने पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. साहजिकच पनीरसेल्वम व पलानीस्वामी या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या सर्वशक्तिमान सरचिटणीस या पदाची फोड करून समन्वयक व सहसमन्वयक अशी दोन पदे निर्माण केली आहे. चिन्नम्मांच्या भीतीमुळे या दोघांमधील दिलजमाईचा उतारा कितपत लागू होतो हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललित यांच्या निधनानंतर राजकीयदृष्टय़ा पोरक्या झालेल्या अण्णा द्रमुकचे कसे काय होणार, याची चिंता सगळ्यांनाच लागली होती. मात्र अण्णा द्रमुकची बांधणी जयाम्मांनी मोठय़ा ताकदीने केलेली आहे. त्यामुळे या केडरबेस पक्षाला धोका नाही. फक्त या पक्षाची धुरा कोणाकडे जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. जयाम्मा हयात असताना व त्यानंतरही शशिकलाबाईंचा राजकीय व सार्वजनिक वावर संशयास्पद राहिलेला आहे. जयललिता मुख्यमंत्री असताना शशिकलाबाई भल्यातच पॉवरफूल होत्या. ‘चिन्नम्मा’ हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले ते यामुळेच. मात्र आता पनीरसेल्वम व पलानीस्वामींनी आपापसात दिलजमाई करून शशिकलाबाईंना रोखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या दिलजमाईचा उतारा कितपत लागू होतो हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
कोणताही राजकीय पक्ष हा संपत नसतो. त्याच्या वाटचालीत चढउतार येतच असतात. जयललितांच्या निधनानंतरही अण्णा द्रमुक हा पक्ष आणि सरकार पनीरसेल्वम व पलानीस्वामी यांनी आडवा विस्तव जात नसतानाही चांगल्या पद्धतीने चालवले होते. तमिळी जनतेच्या पॅटर्ननुसार दर पाच वर्षांनी तिकडे सत्ताबदल हा होतोच होतो. ती तमिळी जनतेची परंपरा आहे. त्यामुळे अण्णा द्रमुक सध्या विरोधी बाकांवर आहे. मात्र आता गजाआड राहिलेल्या शशिकलाबाई आता ‘बाहेर’ आल्या आहेत. त्यांच्याही सूप्त राजकीय महत्त्वाकांक्षा आहेतच. जयललिता मुख्यमंत्री असताना जयाम्मा सीएम तर चिन्नम्मा सुपर सीएम असे समीकरण असायचे. जयललितांच्या निधनानंतर चिन्नम्मांनाच सारा पक्ष घशात घालायचा होता, मात्र या बाईंना ‘कंट्रोल’मध्ये ठेवता येणार नाही हे लक्षात आल्याने दिल्लीकरांनी बाईंना ‘आत’ पाठवायची व्यवस्था करून पनीरसेल्वम व पलानीस्वामी यांच्या पारडय़ात माप टाकले. या दोघांनी परस्परांत मतभेद असूनही राज्य चालवले. आता बाहेर आलेल्या चिन्नम्मा पुन्हा पक्षात परतल्या तर पक्षाचा ताबा घेतील हे ध्यानात आल्यानंतर पनीरसेल्वम व पलानीस्वामी यांनी पक्षाच्या नेतेपदी आपला संयुक्त शपथविधी उरकून घेतला आहे. 2024 च्या दृष्टीने दिल्लीकरांसाठी अण्णा द्रमुक हा महत्त्वाचा पक्ष राहणार आहे. तो आपल्या ‘होयबा मंडळीं’च्याच हातात असावा असा दिल्लीतून प्रयत्न होताच. त्याबरहुकूम सगळे घडले. नाराज चिन्नम्मांनी राजकारणात येण्याची घोषणा करून ‘पीछेमूड’ केलेल्या रजनीकांत यांची भेट घेऊन सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र चिन्नम्मांच्या तावडीतून अण्णा द्रमुकला वाचविण्याचे कार्य पनीरसेल्वम व पलानीस्वामी या जोडगोळीने केले आहे किंवा कसे, हे नंतरच समजेल.
भाजप खासदारांची दांडी
‘जनतेने तुम्हाला मोठय़ा अपेक्षेने निवडून दिले आहे. दिल्लीत येऊन संसदेबाहेर चकाटय़ा पिटण्यासाठी निवडून दिलेले नाही. तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवा नाहीतर बदल हा आपोआप घडत असतो,’ ही विधाने आहेत देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांची. ती संबंधित आहेत भाजप खासदारांच्या संसदेतील अनुपस्थितीला उद्देशून. भाजप खासदारांच्या बैठकीत पंतप्रधानांनी हे हताश उद्गार काढले. याचे कारण म्हणजे ‘कोरोना’सारख्या महाभयंकर महामारीवर संसदेत चर्चा होणार होती. मात्र इतक्या महत्त्वाच्या विषयावेळीही सभागृहात दांडी मारण्याचा कोडगेपणा भाजप खासदारांनी दाखवला. त्यामुळे मोदी खट्टू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रचंड मेहनती आहेत. ते पक्षासाठी तळमळीने बोलतात, कार्य करतात. भाजप खासदारांच्या डोक्यात ते का शिरत नाही? हा खरा प्रश्न आहे. संसदेत दांडी मारण्यावरून पंतप्रधानांनी यापूर्वीही भाजप खासदारांना सुनावले. मात्र परिणाम शून्य. याचा थोडा कानोसा घेतला तर लोकसभेतील भाजपचे बहुतांश खासदार ‘अपसेट’ आहेत. कोरोनाचे निमित्त करून बंद केलेला खासदार निधी आता पाच राज्यांमध्ये निवडणुका असल्याने खासदारांची नाहक नाराजी नको म्हणून सरकारने सुरू केला आहे. मात्र हाताशी खासदार निधी नसल्याने भाजप खासदारांना गावागावांमध्ये शिरणे मुश्कील झाले आहे. लोकांच्या अपेक्षा भरमसाट, मात्र सरकारकडून सहकार्य नाही. याउलट रात्री उशिरापर्यंत सभागृहात बसा. इकडतिकडचे कार्यक्रम करा. ‘भाईसाब, सांसद बनने का पहलेवाला मजा अब नही बचा. हमारी कोई पूंछ नही,’ ही एका सातत्याने निवडून येणाऱ्या भाजप खासदाराची खासगीतली प्रतिक्रिया बोलकी आहे. पंतप्रधानांनी आदल्या दिवशी कानपिचक्या दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहतानाही भाजप खासदारांनी पुन्हा दांडी मारली. आता बोला..!!
विनाकारण शेरेबाजी
संपूर्ण देश एक आहे अशा घोषणा आपल्याकडे नेहमीच दिल्या जातात. मात्र हे ऐक्य समाजात दिसते का, तर ते संसदेत तरी कसे दिसेल? राजकीय टिप्पणी केल्यानंतर एखाद्याला ‘ट्रोल’ करण्यासाठी भाजपचे भक्तमंडळ टपूनच बसलेले असते. मात्र देशाच्या संसदेतही विरोधी पक्षाच्या खासदाराला सत्ताधाऱ्यांकडून धडपणे बोलू दिले जात नसल्याचे दुर्दैवी चित्र गेल्या आठवडय़ात दिसून आले. पंतप्रधानांविरोधात कोणी टिप्पणी केली तर त्याचा आवाज बंद केला जातो. मात्र द्रमुकच्या कनिमोझींची केवळ शब्दाच्या उच्चारणावरून टर उडवली गेली हे दुर्दैवी आहे. त्याचे झाले असे की, कनिमोझी इंग्रजीत भाषण करत होत्या. त्यात पंतप्रधानांचा आवडता असा ‘आत्मनिर्भर’ हा शब्द त्यांना काही केल्या उच्चारता येत नव्हता. कनिमोझी यांची तामिळी पार्श्वभूमी व तिकडे हिंदीला असलेले नगण्य स्थान या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी त्यांना उलट सहकार्य करायला हवे होते. मात्र तुम्हाला आत्मनिर्भर शब्दच कसा उच्चारता येत नाही? असा पवित्रा घेत भाजप खासदारांनी विनाकारण शेरेबाजीला सुरुवात करताच एरव्ही नम्र असलेल्या कनिमोझी यांनी आक्रमक अवतार धारण करत थेट तामिळीमध्ये बोलायला सुरुवात केली. ‘आता तुम्ही याचा अर्थ सांगाल काय?’ असा प्रतिसवाल सत्ताधारी खासदारांना केल्यानंतर त्यांची बोलती बंद झाली. संसदीय कामकाजातील काही महत्त्वाचे शब्द एकतर इंग्रजीत किंवा त्या त्या राज्यांच्या प्रादेशिक भाषेत उच्चारण्याची व्यवस्था गरजेची आहे, अशी एक ठाम भूमिकाही कनिमोझींनी मांडली आहे. अनेक खासदारांची ‘मन की बात’ त्यांनी बोलून दाखवली आहे.



























































