दिल्ली डायरी – उत्तर प्रदेशः पुढील मुख्यमंत्री कोण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी 

उत्तर प्रदेशमध्ये काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. उत्तर प्रदेशच्या प्रचाराच्या पाचव्या टप्प्यामध्ये गोरखपूरमधील भाजपच्या पोस्टरवरून योगी आदित्यनाथांचे ‘गायब’ होणारे फोटो सूचक संकेत देत आहेत. सध्या तरी पोस्टरवरून योगी आदित्यनाथ गायब झाले आहेत. 10 मार्चनंतर त्यांना राजकीय पटलावरून गायब करण्याचे डावपेच केव्हाचेच टाकले गेले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री कोण आणि कोणत्या पक्षाचा? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

सर्वशक्तीमान अशा केंद्र आणि राज्य सरकारविरोधात समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी ही निवडणूक एका योद्धय़ाप्रमाणे एकाकी लढली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुलायमसिंग घराबाहेरही पडू शकले नाहीत. इतर कोणाची साथ अखिलेश यांना मिळाली नाही. त्यामुळे एरवी सकाळी उठल्यानंतर फुटबॉल, टेनिस वगैरे खेळणाऱ्या अखिलेश यांनी हे सगळे छंद गुंडाळून ठेवत निवडणुकीत झोकून दिले. समाजवादी पार्टीचा विजय झाला तर त्याचे श्रेय अखिलेश यांना मिळेल. ते केवळ मुख्यमंत्रीच होणार नाहीत, तर राष्ट्रीय राजकारणात एका तरुण नेत्याचा उदयही यानिमित्ताने होणार आहे. अखिलेश यांनी बाजी मारली तर भाजपची सत्तेच्या राजकारणातून घरवापसी ठरेल. कारण त्यानंतर दोन वर्षांत दिल्लीची सत्ता पुन्हा पादाक्रांत करणे भाजपसाठी मोठे आव्हान असेल. दुसरीकडे भाजपची निसटती जरी सत्ता आली तर त्या पक्षासाठी तो मोठा ‘बूस्टर डोस’ ठरेल.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीची एक घटना. एका बडय़ा दिल्लीकर नेत्याचा उत्तराखंडच्या राजभवनावर फोन जातो. फोन खणाणतो. ‘‘बेबीजी… आप को विधानसभा चुनाव लडना आहे. बडा दायित्व आपको मिलने वाला है. आप तैयारी करो,’’ असा संदेश देऊन फोन बंद होतो. त्यानंतर उत्तराखंडच्या राज्यपाल बेबीरानी मौर्या राज्यपालपदाचा तडकाफडकी राजीनामा देतात आणि आग्रा ग्रामीणमधून उमेदवारी अर्ज भरतात. सगळे कसे एखाद्या कथानकाप्रमाणे घडले. अर्थात ही पटकथा, नेपथ्य आणि दिग्दर्शन दिल्लीकरांचे! योगी आदित्यनाथ ‘नाकापेक्षा मोती जड.’ त्यातच त्यांच्या राजवटीने भाजपची सगळी समीकरणे बिघडवून टाकली. योगींच्या ठाकूरधार्जिण्या राजकारणामुळे भाजपची व्होट बँक दुरावली गेली. त्याचा फटका 2024 मध्ये बसू नये  यासाठी आणि योगींचे सध्या सुरू असलेले महिमामंडन थांबविण्यासाठी दिल्लीकरांनी एक अफलातून युक्ती करत राज्यपाल असलेल्या बेबीरानी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून एकाच दगडात अनेक पक्षी मारले. आग्य्राच्या राज्यपाल असणाऱ्या बेबीरानी या मायावतींप्रमाणेच जाटव समाजातून येतात. त्या महापौरही होत्या. एक प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मायावतींनी भाजपच्या ‘ए टीम’प्रमाणे काम केले आहे. या निवडणुकीनंतर त्याची ‘बक्षिसी’ मिळणार अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. अशा परिस्थितीत मायावतींचा पक्ष एकतर भाजपात विलीन करायचा किंवा तो पक्ष ताब्यात घेऊन मायावतींच्याच जातीच्या एका महिलेच्या हाती उत्तर प्रदेशचा कारभार देऊन सामाजिक व राजकीय समतोल साधण्याचा दिल्लीकरांचा एक अजेंडा आहे. योगींच्या राज्यात उत्तर प्रदेशमध्ये दलितांवर अत्याचार झाले. 2019 पर्यंत या समाजाने भाजपची पाठराखण केली. मात्र सध्याच्या निवडणुकीत भाजपकडे या समाजाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे सामाजिक व राजकीय समतोल साधण्याबरोबरच योगींचे जुने हिशेब चुकते करण्यासाठी बेबीरानी मौर्या यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसविण्याचे मनसुबे दिल्लीत रचले गेले आहे. बहुमत मिळाले नाही तर मायावती सहजपणे आपल्याच जातीतील महिलेला पाठिंबा देतील, ही सोपी अटकळ यामागे आहे.

अयोध्येत काय होईल?

‘जय श्रीराम’चा नारा देत भाजपचा राममंदिर निर्माणाचे श्रेय उपटून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत हिंदू–मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहे. उलट ज्या राममंदिराचा मुद्दा तापवून भाजपने लोकसभेतील दोन संख्याबळावरून बहुमताच्या सत्तेचा सोपान गाठला. त्या प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतच भाजपची दाणादाण उडण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या सत्ताकर्त्यांनी सत्तेवर आल्यानंतर काही नावीन्यपूर्ण केलेले नसले तरी, कोणत्याही गोष्टीचा ‘इव्हेंट’ करण्यात या मंडळींचा कोणी हात पकडू शकणार नाही. बडय़ा उद्योगपतींच्या घशात मोक्याच्या जागा घालण्यासाठी योगींनी तिथे ‘न्यू अयोध्या’चा नारा देत जुन्या फैजाबाद रोडलगतच्या सगळ्या वास्तू पाडल्या. 800 पेक्षा अधिक दुकाने, अनेकांची घरे, मोक्याच्या जागा गेल्या. या न्यू अयोध्येत आपल्याला कोणतेही स्थान असणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर साधू-महंत मंडळी भडकली. अनेक छोटीमोठी मंदिरे पाडली. तिथले पुजारी रस्त्यावर आले. तीन चार पिढय़ांचे व्यापारी रस्त्यावर आले. या सगळ्यांनी भाजपला पराभूत करण्याचा विडा उचलला आहे. भाजपचे विद्यमान आमदार वेदप्रकाश गुप्ता यांच्याविरोधात तर जनतेत कमालीचा रोष आहे. त्याचाच फायदा समाजवादी पार्टीच्या तेजनारायण पांडे यांना होताना दिसत आहे. अयोध्येची जागा वाचविण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री महेश शर्मा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संघाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह महिनाभरापासून अयोध्येत ठाण मांडून आहेत. मात्र प्रभू रामचंद्राच्या अयोध्येत रामाच्या नावावर राजकारणाच्या पोळय़ा भाजणाऱ्यांचे तोंड पराभवाने पोळण्याचीच चिन्हे आहेत.

कीनू मीठी है जी!

राजकारणात कधी काय घडेल याचा भरवसा नसतो. ‘कठीण समय येता कोण कामास येतो?’ अशा प्रसंगी दंभ-दर्पाची झूल काढून कोणाचेही पाय धरावे लागतात. उत्तर प्रदेशमध्ये काय होणार याचा अंदाज बहुधा भाजपमधील चाणक्यांना खूपच आधी आला असावा. त्याचे कारण असे की, पंजाबात मतदानाच्या भल्या सकाळी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांच्या घरचा फोन वाजतो. दिल्लीतून दस्तुरखुद्द अमित शहा त्यांची ख्यालीखुशाली विचारतात. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर, ‘‘आपके फार्म के कीनू (एक फळ) मिल गये. पिछले साल सें भी अधिक मीठे है. मै हर दिन इसका ज्यूस पीता हूं.’’ असे हे मीठास संभाषण ‘दिल्ली में मिलेंगे’ या निरोपाने संपते. काही महिन्यांपूर्वी मित्रपक्षांना हिणकस वागणूक देणाऱ्या, एनडीएतील घटक पक्षांना कस्पटासमान समजणाऱ्या, अहंकार आणि दंभदर्पात बुडालेल्या भाजप नेत्यांच्या तोंडी ही ‘मीठास वाणी’ कशी काय आली? याचे उत्तर कदाचित उत्तर प्रदेशच्या निकालांत दडलेले असेल. तीन वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधात अकाली दलाने मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता हे तीन कायदेच मागे घेतल्याने पंजाबात अकाली दलाभोवती भाजप नेते पुन्हा पिंगा घालत आहेत. पंजाबच्या गावागावांमध्ये जनतेने भाजपच्या पुढाऱ्यांना घुसू दिले नाही. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे चांगले चाललेले करिअरही भाजपच्या नादाला लागून त्यांनी स्वहस्ते देशोधडीस लावले. पंजाबात काँग्रेसपाठोपाठ अकाली दलही चांगली कामगिरी करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत आता फायदा नाही झाला तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अकाली दलाशी मैत्री गरजेची आहे हे लक्षात आल्यानंतर, अमित शहा यांना हरसिमरत यांच्या फार्ममधील ‘कीनू’ भलतेच गोड असल्याचा ‘साक्षात्कार’ झाला.

[email protected]