
नीलेश कुलकर्णी <<[email protected]>>
काँगेस अध्यक्ष राहुल गांधी हळूहळू राजकीयदृष्टय़ा सुधारत असल्याचे नवे उदाहरण म्हणजे त्यांनी हिंदुस्थानात साजरा केलेला वाढदिवस! नाहीतर एरवी राहुलबाबा वाढदिवस विदेशात साजरे करायचे आणि तमाम काँगेसी १० जनपथ व २४ अकबर रोडवर फटाके फोडायचे असा हास्यास्पद प्रकार गेली अनेक वर्षे सुरू होता.
यंदा राहुल यांनी विदेशवारीचा मोह आवरून वाढदिवस दिल्लीतच साजरा केला. दिवसभर काँगेसी मंडळींकडून बुके आणि मिठाईचा स्वीकारही त्यांनी सहर्ष केला. त्यानंतर दिल्लीच्या खान मार्केटमध्ये गांधी घराण्याचे ‘टाऊन हॉल’ नावाचे रेस्टॉरंट खूपच आवडीचे आहे. अनेकदा सोनिया गांधी व राहुल गांधींना या रेस्टॉरंटमध्ये मेजवानीवर ताव मारताना अनेकांनी पाहिले आहे. इतकेच नाही तर सोनिया या मार्केटमध्ये सर्वसामान्य गृहिणीसारखी बाजारहाट करतानाही अधूनमधून दिसतात.
हिंदुस्थानात साजऱया झालेल्या वाढदिवसाप्रीत्यर्थ राहुल यांनी आपल्या कुटुंबीयांना टाऊन हॉलमध्ये मेजवानी देण्याचे ठरवले. राहुल त्यांच्या कुटुंबीयांसोबत या रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच तिथे अगोदरच काही काँगेसी मंडळी ‘तर्रर्र’ अवस्थेत असल्याचे राहुल यांना दिसली. साक्षात राहुल गांधींचे दर्शन होताच या मंडळींची नशा तत्काळ उतरली आणि जमेल तशा पद्धतीने राहुलबाबांना ‘हॅपी बर्थ डे’ न म्हणताच काही काँगेसींनी खान मार्केटमधून धूम ठोकली. राहुल यांनी दिल्लीतच वाढदिवस साजरा करून विरोधकांना गप्प केले असले तरी सत्ता गेली तरी त्यांना कायमच ‘तर्रर्र’ असणाऱया काँगेसींना वठणीवर आणावे लागेल.
























































