लोणावळय़ात बेपत्ता झालेल्या दिल्लीच्या तरुणाचा मृतदेह आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोणावळा येथील नागफणी पॉइंट परिसरातील घनदाट जंगलात रस्ता चुकल्याने बेपत्ता झालेल्या फरहान शहा या दिल्लीच्या तरुणाचा मृतदेह मंगळवारी खोल दरीत सापडला. रस्ता शोधत असतानाच फरहान पाय घसरून चारशे फूट खोल दरीत पडला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

रोबोट कंपनीत कार्यरत असलेला फरहान शुक्रवारी कामानिमित्त पुण्याला आला होता. त्यानंतर तो लोणावळा येथील नागफणी पॉइंट परिसरात एकटाच फिरण्यासाठी गेला होता. तेथे रस्ता चुकल्याने तो परत येऊ शकला नव्हता. याबाबतची माहिती त्याने फोन करून आई-वडिलांना दिली होती. त्यानुसार त्यांनी फरहान बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलीस, शिवदुर्ग रेस्क्यू, कुरवंडे गावचे ग्रामस्थ फरहानचा शोध घेत होते. दरम्यान आज सकाळी आयएनएस शिवाजी येथील जवानांनी दरीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार एनडीआरएफच्या पथकाने दरीत उतरून पाहणी केली असता फरहानचा मृतदेह आढळून आल्याचे लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डुबल यांनी दिली. घनदाट जंगलात रस्ता चुकल्यानंतर फरहान रस्ता मिळेल या आशेने धबधब्याच्या दिशेने खाली येत होता. तेव्हाच पाय घसरून तो दरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, फरहानच्या कुटुंबीयांनी त्याच्या शोधासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.