‘आप’ला आणखी एक धक्का, पक्षाच्या एकमेव ट्रान्सजेंडर नगरसेवकाचा राजीनामा; नवीन पक्षात प्रवेश

दिल्ली महानगरपालिकेचे (MCD) पहिले ट्रान्सजेंडर नगरसेवक बॉबी किन्नर यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते आता इंद्रप्रस्थ विकास पक्षात (IVP) सामील झाले आहेत. ते सुलतानपूर मजरा विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 43 चे नगरसेवक आहेत. आप पक्ष सोडणारे बॉबी किन्नर हे 16 वे नगरसेवक आहे.

याआधी शनिवारी 15 नगरसेवकांनी राजीनामा देऊन आयव्हीपी स्थापनेची घोषणा केली होती. या सर्व नेत्यांनी पक्षावर विकासकामात दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. राजीनामा दिलेल्या नगरसेवकांमध्ये हेमचंद गोयल, हिमानी जैन, रुनाक्षी शर्मा, उषा शर्मा, अशोक पांडे, राखी यादव, साहिब कुमार, राजेश कुमार लाडी, मनीषा, सुमन अनिल राणा, देविंदर कुमार आणि दिनेश भारद्वाज यांचा समावेश आहे.

आप पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर या नगरसेवकांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते की, “आम्ही सर्व नगरसेवक 2022 मध्ये आपच्या तिकिटावर एमसीडीवर निवडून आलो होतो. मात्र 2022 मध्ये निवडणुका जिंकूनही पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व एमसीडी योग्यरित्या चालवू शकले नाही. वरिष्ठ नेते आणि नगरसेवकांमध्ये कोणताही समन्वय नव्हता. ज्यामुळे पक्ष विरोधी पक्षात आला आहे. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू न शकल्यामुळे, आम्ही नगरसेवक पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत.”