
दिल्लीतील बवाणा परिसरात पुन्हा एकदा गँगवारच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गुरुवारी काही अज्ञात हल्लेखोरांनी एका घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चार जणांवर गोळीबार करण्यात आला असून, त्यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे या गोळीबारात एका १० वर्षांच्या चिमुरड्याच्या पायालाही गोळी लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. हल्लेखोरांनी घरात शिरून अनेक राऊंड फायरिंग केली. या भीषण हल्ल्यात एकाच जागीच मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण बवाणा परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला गँगवारचा परिणाम असल्याचे दिसून येत आहे. यामागे कुख्यात टिल्लू गँगचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जुन्या वादातून किंवा वर्चस्वाच्या लढाईतून हा गोळीबार करण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर बवाणा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.





























































