दिल्लीवाल्यांची भीती वाटते! गुलजार यांचा मोदी सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीएए आणि एनआरसीवरून देशभरात भडका उडाला असतानाच ख्यातनाम गीतकार गुलजार यांनी रविवारी मोदी सरकारवर निशाणा साधला. हल्ली मला दिल्लीवाल्यांची खूप भीती वाटते. त्यांच्यापासून सावध राहायला हवे. ते कधी कोणता कायदा आणतील याचा नेम नाही, अशा शब्दांत त्यांनी केंद्राच्या वेगवेगळे कायदे लादण्याच्या भूमिकेवर नाराजीचा सूर आळवला.

नवी दिल्लीत खासगी वृत्तसमूहाच्या साहित्य पुरस्कार समारंभात बोलताना त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. या समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी वृत्तसमूहाचे सल्लागार मला भेटायला दिल्लीहून मुंबईत येत होते. मी घाबरून गेलो होतो. कारण मला आजकाल दिल्लीवाल्यांची भीतीच वाटते. ते कधी कोणता कायदा आणतील हे कोणालाच सांगता येणार नाही, अशी टिप्पणी गुलजार यांनी केली. मी आपणाला ‘मित्रों’ म्हणणार होतो, परंतु तसे बोलणे थांबवले असे भाषणाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करीत गुलजार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच चिमटा काढला.