
दिल्लीतील लॉकडाऊन आणखी शिथील करत तिथल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये दारूविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र क्लब आणि बार बंदच राहतील असे नव्या आदेशात सांगण्यात आले आहे. दिल्लीतील आपत्ती व्यवस्थापन विभागाने तिथली हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास हरकत नसल्याचे सांगितले होते. हा आदेश जारी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली सरकारने त्यांच्या अबकारी विभागाला हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये दारूविक्रीची परवानगी देण्यात यावी असे आदेश दिले आहेत.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अबकारी विभागाला आवश्यक ती परवानगी सादर करून हॉटेलच्या खोल्यांमध्ये आणि खानपान सेवा असलेल्या रेस्टॉरंटना दारूविक्रीस परवानगी द्यावी असे आदेश दिले आहेत. राज्याच्या महसूलाकडे पाहाता हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. हा आदेश जारी झाला असला तरी शुक्रवारपासून लगेच याला परवानगी मिळेल असे नाही. या आदेशावर दिल्लीच्या नायब राज्यपालांकडून संमती येणं अद्याप बाकी आहे. ती मिळाल्यानंतर या आदेशाची अंमलबडावणी होऊ शकेल. तिथले नायब राज्यपाल अनिल बैजल हे दिल्लीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी यापूर्वी राज्य सरकारच्या काही निर्णयांना केराची टोपली दाखवलेली आहे.
केंद्र सरकारच्या अनलॉकसंदर्भातील नियमावलीनुसार बार हे बंदच राहणार असल्याचे दिल्ली सरकारने म्हटले आहे. आसाम, पंजाब, राजस्थान सारख्या राज्यांमध्ये दारूसेवनाचा परवाना असलेल्यांना अबकारी कायद्यातील तरतुदीनुसार रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या खोल्यांमध्ये दारू देण्यास परवानगी आहे. 8 जूनपासून केंद्र सरकारने हॉटेस आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार दिल्लीतील हॉटेल सुरू होण्यास सुरुवात झाली होती. दिल्लीमध्ये वाईन शॉपमधून दारू विक्रीला मे महिन्यात परवानगी देण्यात आली होती.





























































