
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
स्मार्टफोन हॅक होणे ही आता सामान्य बाब आहे. पण याच स्मार्टफोन हॅकर्सचा मोर्चा आता स्मार्ट टीव्हीकडे वळला आहे. स्मार्टफोनमध्ये जसे सॉफ्टवेअर काम करते तसेच सॉफ्टवेअर स्मार्ट टीव्हीतही असते. यामुळेच हॅकर्सना टीव्ही हॅक करणे सोपे झाले आहे.
सॅमसंग या नामांकित कंपनीचे मोबाईल जसे लोकप्रिय आहेत, तसेच या कंपनीच्या स्मार्ट टीव्हीलाही मोठी मागणी आहे. मात्र काहीजण या टीव्हीतील स्मार्टसोयींचा गैरवापर करत असल्याचे कंपनीने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. तसेच हॅकर्सपासून तुमचा स्मार्ट टीव्ही सुरक्षित ठेवायचा असेल तर त्यासाठी एका धोकादायक कोडपासून सावध राहण्याचा सल्ला कंपनीने ग्राहकांना दिला आहे. हल्ली बाजारात काही असेही स्मार्ट टीव्ही आले आहेत ज्यांच्यात इन बिल्ट मायक्रोफोन आहेत. ज्यामुळे यापुढे रिमोट वरून चॅनल सर्फिंग करण्याची गरज नसेल. तर तुम्हांला वॉईस कमांडने जो कार्यक्रम बघायचा असेल त्याचे नाव सांगितले तरी टीव्हीवर तो कार्यक्रम लगेच दिसणार आहे. पण यात एक धोकाही आहे. कारण टीव्ही सुरू केल्यानंतर तुम्ही घरात कोणाही बरोबर जे काही बोलाल ते टीव्हीतला मायक्रोफोन कॅच करणार आहे. यामुळे तुमचे संभाषण ऐकणे हॅकर्सला सहज शक्य आहे. तसेच दुसरीकडे काही स्मार्ट टीव्हीमध्ये Always On असलेले वॉईस कमांड असणार आहेत. ज्यात टीव्ही बंद जरी असला तरी त्यातील मायक्रोफोन सुरूच असणार आहेत. ज्यामुळे तुमचे घरातील सर्व संभाषण हॅकर्सला ऐकता येणार आहे.
तर नव्याने येणाऱ्या स्मार्टटीव्हीमध्ये कॅमेराही इम बिल्ट असणार आहे. या कॅमेऱ्यातूनही हॅकर्स तुमच्या घरातील हालचाली बघू शकणार आहे. तसेच तुमचे संभाषणही तो ऐकू शकणार असल्याने या टीव्हींचा वापर तुम्हांला स्मार्टपणे करावा लागणार आहे.





























































