
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
चारा घोटाळाप्रकरणी दोषी ठरल्यानंतर शिक्षा भोगत असलेले राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचे चिन्ह नाही. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू असून ते रांची येथील रिम्स रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या किडनीतून प्रथिने वाहून जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे उपचार म्हणून त्यांना दररोज चार अंडी खावी लागत आहेत. दरम्यान, चारा घोटाळाप्रकरणी लालूंच्या याचिकेवर 12 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
लालूंच्या किडनीने जवळपास 50 टक्के काम करणे बंद केले आहे. दररोज चार अंडय़ांमधला पांढरा भाग खाल्ल्याने त्यांची किडनी पूर्ववत होईल अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. रुग्णालयात लालूंची महिन्यातून एकदा पूर्ण तपासणी केली जाते. पावसाळा सुरू झाल्यामुळे लालूंना विशेष काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. त्यांच्या खाण्यापिण्यावर डॉक्टर खास लक्ष देत आहेत. रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर डी. के. झा यांनी सांगितले की, आंब्याच्या मोसमात त्यांनी भरपूर आंबे खाल्ले. त्यामुळे त्यांच्या शरीरात शुगर वाढली होती. ती नियंत्रित करण्यासाठी त्यांना इन्सुलिन देण्यात येत आहे.


























































