मेट्रोच्या दरवाजात साडी अडकली अन् पुढे अनर्थ घडला, 35 वर्षीय महिलेने जीव गमावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली मेट्रोच्या इंद्रलोक स्टेशनवर अपघात झालेल्या महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. गुरुवारी मेट्रोच्या दरवाजात साडी अडकून महिला मेट्रोखाली आली होती. अपघातानंतर जखमी महिलेला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र शनिवारी तिचा मृत्यू झाला.

रीना (35) असे त्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी मेट्रोतून उतरताना की चढताना अपघात झाला याबाबत काही माहिती मिळालेली नाही. मात्र त्याचदरम्यान तिची साडीचा पदर मेट्रोच्या दरवाजात अडकला होता. दिल्ली मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी, अनुज दयाल यांनी सांगितले की, गुरुवारी इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर ही घटना घडली होती. त्यावेळी महिलेचा मेट्रोच्या दरवाजात साडीचा पदर अडकला आणि ती थेट मेट्रोच्या खाली आली. त्यानंतर महिलेला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान शनिवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मेट्रो सुरक्षा आयुक्त या घटनेचा तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत आणि गरज लागल्यास कायद्याची मदत घेतली जाईल असे सांगितले.

महिलेचा नातेवाईक असलेल्या विक्कीने सांगितले की, ती पश्चिम दिल्लीतील नांगलोई येथून मोहन नगरला जात होती. जेव्हा ती इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर पोहोचली त्यावेळी तिच्या साडीचा पदर मेट्रोच्या दरवाजात अडकला आणि ती मेट्रोखाली आली. ती गंभीर जखमी झाली. तिला गंभीर अवस्थेत सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. शनिवारी संध्याकाळी तिचा मृत्यू झाला.