
सामना प्रतिनिधी। नवी दिल्ली
हा देश, संविधान 70 वर्षांपासून 370 कलमाचा एक डाग घेऊन चालले होते. तो कलंक आज खऱया अर्थाने नष्ट करण्याचे काम 370 कलम हटवून करण्यात आले आहे. आजच्या या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून पुष्पवृष्टी करत असतील. कश्मीरचा तिढा सुटला, आता बलुचिस्तान व पाकव्याप्त कश्मीरही ताब्यात घ्या आणि अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने राज्यसभेत करण्यात आली.
जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 व 35अ हटविण्यासंदर्भातील विधेयकाचे शिवसेनेने राज्यसभेत जोरदार समर्थन केले. या ऐतिहासिक विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तडाखेबंद भाषण करताना शिवसेनेची खणखणीत भूमिका मांडली. कलम 370 हा हिंदुस्थानवरचा कलंक होता तो 70 वर्षांनी दूर झाला. 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्यदिन, 9 ऑगस्टला क्रांतिदिन साजरा करतो, मात्र आज 5 ऑगस्टला आपण एक नवी क्रांती घडवली असून संपूर्ण देशातच नाही, तर जगभरात जिथे जिथे हिंदुस्थानी असतील ते आनंदित झाले असल्याचे राऊत यांनी सांगितले.
अखंड हिंदुस्थानचे आपल्या पूर्वजांचे एक स्वप्न होते. त्यासाठी ज्या निर्णयाची हा देश आणि हे सभागृहदेखील वाट पाहत होते असा क्रांतिकारी निर्णय झाला आहे. ‘कलम 370 ला हात लावाल तर तो हात होरपळून निघेल’ अशा धमक्या आजवर दिल्या जात असत. ‘तुम्ही आडवे याच मग आम्ही पण बघू, देशाचे गृहमंत्री इथे बसले आहेत. आता ही धमक्यांची भाषा चालणार नाही’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी कलम 370 ची तरफदारी करणाऱयांना ठणकावले.
सत्तर वर्षांत ज्यांनी जम्मू-कश्मीरच्या जनतेचे शोषण केले, जनतेला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यापासून रोखले तेच आतादेखील या विधेयकाला विरोध दर्शवत आहेत. मात्र आता हेच विरोधक सभागृहात झोपले आहेत. आपण आता काम करू, आपण भविष्यात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेऊ, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र आणि शिवसेनेतर्फे अभिनंदन!
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल छत्रपती शिवरायांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातर्फे, शिवसेनेतर्फे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातर्फे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करत असल्याचेही खासदार राऊत यांनी यावेळी नमूद केले.



























































