पाकिस्तानातून मालवाहू विमान हिंदुस्थानात घुसले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

बालाकोट सर्जिकल स्ट्राइकनंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानने आपली हवाई हद्द सील केली आहे. असे असतानाही ‘अँटोनोव्हे एएन-12’ हे मोठे मालवाहू विमान शुक्रवारी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून हिंदुस्थानात घुसल्याने हवाईदल सतर्क झाले. सुखोई विमानांनी त्या विमानाला घेरून जयपूर विमानतळावर उतरण्यास भाग पाडले. हे विमान पाकिस्तानी हवाई हद्दीतून हिंदुस्थानात आलेच कसे आणि त्यामध्ये नक्की कोणता ‘माल’ आहे याबद्दल चौकशी सुरू आहे.

पाकिस्तानने हवाई हद्द सील केल्याने आंतरराष्ट्रीय विमानांनाही वळसा घालून हिंदुस्थानात आणि पाकिस्तानात जावे लागत आहे. बंद असलेल्या हवाई हद्दीतूनच हे मालवाहू विमान हिंदुस्थानात प्रवेश करत असल्याचे दिसताच हवाई दलाच्या सुखोई विमानांनी त्याचा माग घेतला. ते विमान चारी बाजूंनी घेरले गेले आणि जयपूर विमानतळावर उतरवण्यासाठी सिग्नल दिला गेला. हे विमान जॉर्जियाचे असून कराची येथून या विमानाने उड्डाण केले होते. पाकिस्तानच्या हवाईदलाने या विमानाला का रोखले नाही याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत.