
सामना प्रतिनिधी। नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 एप्रिलला वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील हजर असणार आहेत.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव होते. पंतप्रधान वाराणसीतून निवडणूक लढणार आहेत. 26 एप्रिलला अर्ज भरण्यापूर्वी पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथ मंदिरामध्ये जाऊन शंभो शंकराचा आशीर्वाद घेतील. तसेच रविदास गेटपासून ते गोडोलियापर्यंत भव्य रोड शोदेखील आयोजित करण्यात येणार आहे.
फिर एक बार मोदी सरकार
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपाने देखील प्रचार गाणे प्रसिद्ध केले आहे.चलो फिर एक बार हम मोदी सरकार बनाते है, चलो मिलकर साथ आगे देश को बढाते है, असे हे गाणे आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, पीयुष गोयल यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. काम करणारे सरकार, प्रामाणिक सरकार आणि मोठे निर्णय घेणारे सरकार या तीन संकल्पनांवर भाजपा काम करणार असल्याचे जेटली यावेळी म्हणाले. कॉंग्रेसने 72 वर्षात काहीच केले नाही. आम्ही पाच वर्षात खूप कामे केली. कॉंग्रेसचा जाहीरनामा पाहून आश्चर्याचा धक्का बसतो, कारण त्यात मध्यमवर्गीसांठी काहीच नाही. मजबूत सरकार हवे की मजबूर सरकार हे देशातल्या लोकांनीच ठरवावे, अशी टीकाही जेटली यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर केली.
काँग्रेस म्हणतेय, अब होगा न्याय!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची धार वाढवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. रविवारी काँग्रेसच्या वतीने ‘अब होगा न्याय’ या घोषणेचे प्रचार गाणे लाँच करण्यात आले आहे. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले, ‘न्याय’ हे काँग्रेसच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असेल. ‘न्याय’ या शब्दातून केवळ जाहीरनाम्यातील किमान उत्पन्न हमीच नव्हे तर समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यात येईल. देशभरात ठिकठिकाणी कंटेनर ट्रकवर स्क्रीन लावून या गाण्याचा व्हिडीओ दाखवण्यात येईल. जावेद अख्तर यांनी हे गाणे लिहिले असून निखिल अडवाणी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.


























































