तिहार जेलमध्ये प्रियांका, राहुलने घेतली चिदंबरम यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी बुधवारी तिहार तुरुंगात जाऊन माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली. आयएनएक्स मीडिया मनी लॉण्डरिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुह्यात चिदंबरम अद्याप तुरुंगात आहेत.

राहुल-प्रियांका यांच्या भेटीमुळे काँग्रेस पक्ष आमच्यासोबत  असल्याचे दिसून येते, असे वक्तव्य चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी केले. आज 99 दिवस उलटून गेलेत. सुनावणी सुरू नसतानाही इतके दिवस कोठडीत ठेवणे गैर आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल आणि घरी येऊ, असेही कार्ती यांनी म्हटले. सीबीआयने दाखल केलेल्या गुह्यात जामीन मिळाल्यानंतर ‘ईडी’ने 16 ऑक्टोबर रोजी चिदंबरम यांना अटक केली आहे. त्यानंतर आधी ‘ईडी’च्या कोठडीत आणि सध्या न्यायालयीन कोठडीत चिदंबरम यांचा मुक्काम आहे.

दिलासा नाहीच.. कोठडीत 14 दिवसांची वाढ

दिल्ली न्यायालयाने बुधवारी चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी 11 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. ‘ईडी’ने चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी तपास सुरू असल्याचे सांगत चिदंबरम यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली.

महाविकास आघाडीला दिल्या शुभेच्छा

पी. चिदंबरम यांनी बुधवारी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला शुभेच्छा देतानाच भाजपवर कठोर शब्दांत टीकाही केली आहे. तुरुंगात असताना कुटुंबीयांमार्फत ट्विट करून चिदंबरम यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. ‘प्रत्येकाच्या पक्षहिताला सरकारमध्ये दुय्यम स्थान देत शेतकरी कल्याण, गुंतवणूक, रोजगार, सामाजिक न्याय आणि महिला व  बालकल्याण यांना प्राधान्य देणाऱया तिन्ही पक्षांच्या समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्रितपणे काम करा. संसदीय लोकशाहीच्या उक्रांतीवर विश्वास ठेवणारे लोक अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या, विविधांगी समाजासाठी काम करणाऱया राजकीय आघाडय़ा स्वीकारतात. कारण अशा आघाडय़ांतून राजकीय पक्ष तडजोड करण्यास शिकतात. तसेच किमान समान कार्यक्रमावरही सहमत होतात,’ असे चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. भाजपवर टीका करताना चिदंबरम यांनी लिहिलंय, ‘महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी सह्यांसाठी पहाटे चार वाजता राष्ट्रपती कार्यालयाला पाचारण करण्यात आले. हा या कार्यालयावरील एक प्रकारचा हल्लाच होता. यासाठी सकाळी नऊ वाजेपर्यंत वाट का पाहण्यात आली नाही,’  असा सवालही त्यांनी केला.