‘आप’ आमदाराचा कार्यालयातच महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांच्यावर महिलेने बलात्काराचा आरोप केला असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदाराने आपल्या कार्यालयातच कामानिमित्त आलेल्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोहिंदर गोयल हे दिल्लीतील रिठाला येथील आमदार आहेत.

पीडित महिलेने आमदार मोहिंदर गोयल यांच्याविरोधात प्रशांत विहार पोलीस स्थानकामध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेच्या पतीचे 2008 मध्ये निधन झाले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पेन्शनच्या कामानिमित्त ती गोयल यांच्या संपर्कात आली. याचा गैरफायदा घेत माझ्यावर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार महिलेने केली आहे.

delhi-police

पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, ‘गोयल यांनी मला स्वत:च्या घरी भेटायला बोलावले. त्यांनी घरात माझ्यावर बलात्कार केला. यानंतर त्यांनी महिनाभरानंतर स्वत:च्या कार्यालयातही माझ्यावर बलात्कार केला. मी यासंदर्भात स्थानिक नेत्यांकडे मदत मागितली होती. यानंतर गोयल यांनी माझी माफी मागितल्याने मी त्यावेळी पोलिसांकडे तक्रार दिली नाही.’

तसेच गेल्या महिन्यात गोयल यांच्या भावाने मला व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवले. मी पोलिसांकडे तक्रार देऊ नये, यासाठी माझ्यावर दबाव देखील टाकण्यात आला, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. अखेर अत्याचार असह्य झाल्याने 25 फेब्रुवारी रोजी पीडितेने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर गोयल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान बलात्काराचे हे आरोप आमदार गोयल यांनी फेटाळून लावले आहेत.