मृत्यूपूर्वी शीला दीक्षित यांनी सोनियांना लिहलेल्या पत्रामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ

128

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

मुख्यमंत्री म्हणून सलग 15 वर्ष दिल्लीवर राज्य करणाऱ्या शीला दीक्षित यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाला तीन दिवसच उलटले असताना त्यांनी मृत्यूपूर्वी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना लिहलेल्या पत्रामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेससाठी लढणाऱ्या दीक्षित यांनी या पत्रात काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गटबाजीवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच राज्याचे प्रभारी पी सी चाको यांच्याबरोबर असणाऱ्या वैचारिक मतभेदांचा उल्लेखही त्यांनी या पत्रात केला. काँग्रेस्याच्या अध:पतनाला एक ज्येष्ठ नेता कारणीभूत असल्याचा दावा त्यांनी केला . हा नेता कोण असावा यावरून काँग्रेसमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

तसेच मी घेतलेल्या निर्णयांवर जाणीवपूर्वक आक्षेप घेतले जात आहेत, अशी तक्रारही दीक्षित यांनी या पत्रातून केली. 8 जुलै रोजी दीक्षित यांनी हे पत्र सोनियांना लिहले होते. त्यानंतर सोनिया यांच्या जवळच्या नेत्यांनी दीक्षित, अजय माकन आणि पीसी चाको यांची भेट घेतली. तसेच त्यांना सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण केले जाईल, असे आश्वासनही देण्यात आले. दीक्षित यांना दिल्लीच्या राजकीय वाऱ्यांचा चांगलाच अभ्यास होता. 1998 ते 2013 पर्यंत त्यांनी दिल्लीचा कारभार एकहाती सांभाळला होता.

पण नंतर वैचारिक मतभेदामुळे त्यांना महत्वाचे निर्णय घेताना डावलण्यात आल्याने त्या नाराज होत्या. आपली ही घालमेल पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालण्यासाठी त्यांनी हे पत्र लिहले होते. सोनिया आणि दीक्षित यांच्यात जवळचे संबंध होते.

आपली प्रतिक्रिया द्या