देशात उष्णतेचा प्रकोप वाढला, दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

यंदाचा उन्हाळा मे महिन्यातील सर्व विक्रम मोडत आहे. देशात तापमानाने कहर केल्याने दिल्लीचे उपराज्यपाल व्हि.के. सक्सेना यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या उपराज्यपालांनी कामगारांना दुपारी तीन तासांची सुट्टी घेण्याचे निर्देश दिले आहेत. कामगारांना त्यांचा पगार कपात न करता दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत सुट्टी दिली जाईल, असे म्हटले आहे.

दिल्लीचे व्हि.के. सक्सेना यांच्या निर्देशानुसार, कामगारांसाठी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पगारी सुट्टी द्यावी लागेल. बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना पुरेशा प्रमाणात पाणी व नारळपाणी देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासोबतच नागरिकांना बसस्थानकावर घागरीत पाणी ठेवण्यास सांगण्यात आले आहे.  उत्तर हिंदुस्थानात अधिक परिसरात सूर्य आग ओकत आहे. दिल्लीच्या काही भागांमध्ये मंगळवारी जवळपास 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढवण्यात आले आहे. दिल्लीतील उष्णतेचे कारण म्हणजे आजूबाजूची राज्ये. दिल्लीच्या आजूबाजूला फक्त जमीन आहे, म्हणजे जवळ ना डोंगर आहे ना समुद्र, पण त्यापासून काही अंतरावर राजस्थानचे वाळवंट आहे, जिथे उष्णतेमुळे वाळू तापू लागते आणि तिथून येणारे वारे सुरू होतात. दिल्लीचे तापमान वाढत असून 52 डिग्री झाले आहे.

बिहारच्या शाळेत उष्माघाताने 50 हून अधिक बेशुद्ध

बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत भीषण गरमीमुळे 50हून अधिक बेशुद्ध झाले. विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्याने शाळेत एकच गोंधळ उडाला. बेशुद्धावस्थेतील मुलांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आरोग्य विभागाला फोन केला गेला. बराच वेळ रुग्णवाहीका वेळेत न पोहोचल्याने खासगी वाहनाने सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आले. या दरम्यान आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाने संतप्त लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले.