दिल्लीतील प्रदूषण गंभीर शाळांच्या क्रीडा स्पर्धा पुढे ढकला, हे म्हणजे मुलांना गॅस चेंबरमध्ये ढकलण्यासारखं : सुप्रीम कोर्ट

दिल्लीमध्ये वाढलेल्या प्रदूषणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ‘कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट’ (सीएक्युएम) ला आदेश दिले की, त्यांनी शाळांमध्ये होणाऱ्या क्रीडा स्पर्धांना पुढे ढकलण्यासंबंधी निर्देश द्यावेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. मात्र दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर बनलेली आहे. अशा वातावरणात मुलांच्या स्पर्धा घेतल्यास त्यांना गॅस चेम्बरमध्ये ढकलल्यासारखे होईल, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. या स्पर्धा प्रदूषण मुक्त झाल्यानंतर घेण्यात याव्यात, असेही सर्वोच्च न्यायालयाने सुचवले. सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर सदर प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी ऑमिकस क्युरी अपराजिता सिंह यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, 14 आणि 16 वर्षांखालील शालेय विद्यार्थ्यांची आंतर शालेय क्रीडा स्पर्धा प्रदूषणाच्या या दोन महिन्यात आयोजित करण्यात येत आहे. यावर सुनावणी करताना ‘प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी स्वतःहून पावले उचलावीत, हवेचा दर्जा गंभीर होण्याची वाट पाहू नये,’ असेही न्यायालयाने म्हटले.