
देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएंट आहेत. पण महाराष्ट्रात 70 टक्के केसेस डेल्टा व्हेरिएंटच्या आणि तीस टक्के केसेस ओमायक्रोनच्या आढळत आहेत. त्यामुळे डेल्टा आजही प्रभावशाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोनावरील उपाययोजांनाबाबत संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्राच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
लसींचा जादा पुरवठा
या बैठकीत आम्ही केद्राकडे लसींचा जादा पुरवठा करण्याची लेखी मागणी केली असे सांगून ते पुढे म्हणाले की, कोव्हॅक्सिनच्या 40 लाख लसी व कोविशिल्डच्या 50 लाख लसी उपलब्ध करून द्यावात. कारण हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स, तरुणांचा गट व ज्येष्ठ नागरिकांना कोव्हॅक्सिन लस कमी पडत आहे.
लसीकरणासाठी उपाययोजना
लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणाऱ्या अडचणीही या बैठकीत मांडल्या. कारण काही लोकांना लसीकरणाला विरोध आहे, काहींच्या मनात लसीकरणाबाबत गैरसमज आहेत. त्यामुळे लसीकरण सक्तीचे करण्यासाठी केंद्राने काही उपाययोजना कराव्यात अशी सूचना महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आली.
घरच्या चाचण्यांची आकडेवारी
आज अनेकजण होमकिट्सच्या आणि रॅपिड अँटिजेन चाचण्यांमधून घरच्या घरी चाचण्या करतात. त्यात अनेकजण पॉझिटिव्ह सापडतात, पण त्यांची आकडेवारी मिळत नसल्याची बाब आम्ही पेंद्राच्या निदर्शनास आणून दिली. ज्या फार्मासी कंपन्या या किट्सची विक्री करतात त्यांनी किट्सच्या विक्रीची माहिती ठेवावी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोनवर संपर्क साधून माहिती घेण्याची सूचना यानिमित्ताने आम्ही राज्यातील अधिकाऱ्यांना दिली आहे, असे ते म्हणाले.
प्रोटोकॉलबाबत सुस्पष्टता गरजेची
महाराष्ट्रात चार हजार जिनोम सिक्वेन्स चाचण्या केल्या. त्यात 2 हजार 700 सॅम्पल डेल्टा व्हेरिएंटचे तर तेराशे जण ओमायक्रोनचे आढळले. त्यामुळे महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिएंट आजही प्रभावशाली आहे. अडीच लाख केसेसमध्ये 30 टक्के ओमायक्रोन आहे. अनेक राज्यांमध्ये उपचारांचे प्रोटोकॉल वेगवेगळे आहेत. त्यामुळे पेंद्र सरकारने उपचारांच्या प्रोटोकॉलबाबत सुस्पष्टता द्यावी, अशी मागणी आम्ही केंद्राकडे आवर्जून केल्याचे राजेश टोपे म्हणाले.
सर्व राज्यांत सारखेच निर्बंध गरजेचे
वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निर्बंधांची माहिती पंतप्रधानांना दिली. काही राज्यांत नाइट कर्फ्यू लावला, शाळा -कॉलेज बंद केल्याची माहिती पंतप्रधानांना दिली. पेंद्राने कोणत्याही परिस्थितीत सर्व राज्यांसाठी निर्बधांच्या एसओपी जारी कराव्यात अशी सूचना आम्ही केली. त्यावर आर्थिक नुकसान न होता निर्बंध पाळावेत, असे पंतप्रधानांनी स्पष्ट सांगितल्याचे राजेश टोपे म्हणाले.


























































