पावसाने विश्रांती घेताच राज्यातील विजेची मागणी 3500 मेगावॅटने वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
electricity

राज्यात धुवाधार कोसळल्यानंतर पावसाने गेल्या पाच-सहा दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे महावितरणकडे साडेआकरा हजार मेगावॅटपर्यंत नोंदल्या जाणाऱया मागणीत चक्क साडेतीन हजार मेगावॅटची वाढ होत पंधरा हजारापर्यंत गेली आहे. पाऊस थांबल्याने घरगुती आणि कृषी पंपांचा वीज वापर वाढल्यानेच विजेची मागणी वाढली आहे. महावितरणकडे दररोज सरसरी 17-18 हजार मेगावॅट विजेची मागणी नोंदली जाते. मात्र राज्यभरात सुरू झालेल्या पावसामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून विजेची मागणी कोसळली होती.

पावसामुळे एसी, पंख्यांचा वेग मंदावला होता. तसेच कृषी पंपांचा वापरही घटला होता. त्यामुळे दिवसाची सरासरी मागणी 12 हजार मेगावॅट एवढी नोंदली जात होती. मात्र पावसाच्या विश्रांतीनंतर विजेच्या मागणीत पुन्हा वाढ झाली आहे. आज महावितरणकडे राज्यभरातून पंधरा हजार मेगावॅट एवढी मागणी नोंदली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने महानिर्मितीकडून साडेचार हजार मेगावॅट वीज घेतली असून खासगी प्रकल्पातून पाच हजार तर केंद्रीय वीज प्रकल्पातून सहा हजार मेगावॅट एवढी वीज घेतली आहे.