
सामना प्रतिनिधी । नागपूर
आकाराने लहान असूनही सुगंधीत असलेल्या पार्वती सुत-२७ या धानाच्या नवीन संशोधित वाणाला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाने प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्हयातील सरासरी २०० ऐकरामध्ये भात रोवणीला प्रोत्साहन मिळाले आहे. पार्वती सुत-२७ हे भाताचे वाण इतर वाणाच्या तुलनेत अत्यंत वेगळे असून केवळ १२५ दिवसात उत्पादन मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही या नवीन संशोधित वाणाबद्दल चांगलीच उत्सुक्ता आहे.
पार्वती सुत-२७ हे १२५ दिवसात उत्पादन देणारे तसेच आकाराने लहान असून सुगंधीत असल्यामुळे हे तांदळाचे संशोधित वाण नुकत्याच झालेल्या धान्य महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण ठरले होते. मागील वर्षी १७० ऐकरामध्ये या संशोधित वाणाची प्रायोगिक तत्वावर शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून पीक घेतले होते. शेतकऱ्यांना या संशोधित वाणापासून सरासरी हेक्टरी २० क्विंटल धान झाले असून हे वाण जिल्हयातील इतर कास्तकारांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्माने पुढाकार घेतले असल्याची माहिती प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी दिली.
हलका सुगंधीत व बारीक असलेले पार्वती सुत हे धानाचे नवीन संशोधन चंद्रपूर जिल्हयातील तळोदीचे प्रगतीशिल शेतकरी सुधाकर पोशेट्टीवार यांनी संशोधित केले आहे. धान पिकामध्ये संशोधन करुन पार्वती सुत हे वाण तयार झाल्यानंतर या संशोधित वाणाला इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून शेतकऱ्यांना कमी दिवसात व सरासरी जास्त उत्पादन देणारे हे वाण असल्यामुळे आत्मातर्फे शेतकरी बचतगटाच्या माध्यातून प्रायोगिक तत्वावर उत्पादनाला सुरुवात केली.
शेतकरी उत्पादक कंपनीमार्फतच उत्पादन व थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्मातर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. नवीन संशोधित वाण असल्यामुळे पहिल्याच वर्षी या वाणाला जनतेकडून मागणी मिळविण्यासाठी धान्य महोत्सवात खुले करण्यात आले. संपूर्ण सेंद्रीय पध्दतीने भाताचे उत्पादन घेतल्याने सरासरी उत्पादनही बऱ्याप्रमाणात झाले. प्रायोगिक पध्दतीने २० हेक्टरवर १ हजार ३६० क्विंटल धान उत्पादन झाले. धान्य महोत्सवात सरासरी ७० रुपये किलोप्रमाणे या तांदळाला भाव मिळाला. त्यामुळे हे नवीन वाण जिल्हयातील इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रारंभी धानाचे प्रयोगशाळेत पाठवून उगवणूक क्षमता तसेच आवश्यक गुणधर्म तपासण्यात आले.






























































