पावसामुळे राज्यात वीज कोसळली, विजेची मागणी घसरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे कृषिपंपासह एसी, पंखे, कूलरचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विजेची मागणी घसरली असून आज ‘महावितरण’कडे केवळ साडेअकरा हजार मेगावॅट एवढी कमी मागणी नोंदली आहे. दरम्यान मुंबईची विजेची मागणी  स्थिर असून 2800 ते 3000 मेगावॅटपर्यंत आहे.
उन्हाचा चढलेला पारा आणि वाढलेल्या उकाडय़ामुळे उन्हाळ्यात महावितरणकडे 21 हजार मेगावॅट एवढी मागणी नोंदली आहे, पण सध्या राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे विजेची मागणी घटली आहे. विजेची मागणी घटल्याने महानिर्मितीनेही आपल्या औष्णिक वीज प्रकल्पांना विश्रांती दिली आहे. महानिर्मिती  सध्या केवळ साडेतीन ते चार हजार मेगावॅट एवढी कमी वीजनिर्मिती करत आहे. खासगी प्रकल्पातून पाच हजार मेगावॅट तर केंद्रीय प्रकल्पातून तीन हजार मेगावॅटपर्यंत वीज घेतली जात आहे.

सौरऊर्जेचा आलेख झुकला
पावसामुळे राज्यातील विजेची मागणी घटलेली असतानाच सौरऊर्जा निर्मितीचा आलेखही झुकला आहे. महानिर्मितीच्या शिसूफळा आणि साक्री या सौर प्रकल्पांची सुमारे 180 मेगावॅट क्षमता असतानाही तेथून सध्या केवळ 10 मेगावॅट एवढी कमी वीजनिर्मिती होत आहे.