कॅनडात हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याविरोधात शिख आणि हिंदू प्रचंड आक्रमक झाले असून आज नवी दिल्लीतील दूतावासावर हिंदू शीख ग्लोबल फोरमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज निषेध मोर्चा काढला. आंदोलकांमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठा सहभाग होता. पोलिसांनी दूतावासासमोरील तीन मूर्ती मार्गावर बॅरिकेडिंग करून आंदोलकांना रोखले. परंतु, लोकांनी अक्षरशŠ बॅरिकेड्स तोडले. यानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले.
हिंदू संघटना आणि मंचाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंदिरावरील हल्ल्याचा निषेध केला. हिंदू आणि शीख एकत्र आहेत आणि हिंदुस्थानी लोक कॅनडातील मंदिरांची विटंबना सहन करणार नाहीत, असे फलक घेऊन आंदोलक पोहोचले. आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी दूतावासाबाहेर बॅरिकेड्स लावले आणि मोठय़ा संख्येने फोजफाटा तैनात केला. परंतु, आंदोलन प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांनी बॅरिकेड्स तोडून दुतावास परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी कॅननडाच्या पोलिसांनी चार जणांना अटक केली. यात शीख फॉर जस्टिसचे शीर्ष कार्यकर्ते इंद्रजीत गोसल यांनाही पकडण्यात आले होते, परंतु नंतर त्यांची सुटका करण्यात आली. शीख फॉर जस्टिस या संघटनेवर हिंदुस्थानात बंदी आहे.
याआधीही मंदिरांवर हल्ले
गेल्या काही काळापासून कॅनडातील हिंदू मंदिरे आणि समुदायातील सदस्यांना लक्ष्य करण्यात आले आहे, त्यामुळे हिंदुस्थानी समुदाय चिंताग्रस्त आहे. गेल्या काही वर्षांत ग्रेटर टोरंटो परिसर, ब्रिटिश कोलंबिया आणि कॅनडात इतरत्र हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे.