पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात रोष; हटवण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात निदर्शने

कोल्हापूरमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात रोष उफाळला आहे. महापालिकेच्या हद्दवाढ विषयावर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून दिशाभूल केली जात आहे. कोल्हापूरच्या विकासाच्या एकही प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही. त्यामुळे पालकमंत्री पदावरून दीपक केसरकर यांना हटवण्यात यावे, या मागणीसाठी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीच्या वतीने सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कोल्हापूर शहर हद्दवाढीसाठी कृती समितीच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. दीपक केसरकर यांनी कोल्हापूर पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे हद्दवाढीबाबत लक्ष वेधले होते. मात्र त्यांनी या प्रश्नी कोणतीही जबाबदारी पार पाडलेली नाही.

कोल्हापूर खंडपीठ, पाणी प्रश्न, महापालिका घरफाळा घोटाळा, पंचगंगा,रंकाळा प्रदूषण, महालक्ष्मी मूर्ती संवर्धन, कोल्हापुरी गुळ, चप्पल उद्योगाच्या समस्या याबाबत लक्ष वेधूनही ते घोषणाबाजी आणि चर्चेचे गुऱ्हाळ या व्यतिरिक्त काहीही साध्य करू शकले नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून निष्क्रिय ठरलेली दीपक केसरकर यांचा कार्यभार काढून घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचे निवेदन सादर करण्यात आले. दीपक केसरकर यांना हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आल्याने जनतेचा रोष स्पष्ट होत आहे.