डेंग्यू, मलेरिया आणि  गॅस्ट्रोचे थैमान! आठवडय़ात रुग्णांची संख्या दुपटीने वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना आटोक्यात आला असला तरी गेल्या एकाच आठवडय़ात पावसाळी आजारांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. गेल्या आठवडय़ात मलेरिया रुग्णांची संख्या 119, गॅस्ट्रो 176, डेंग्यू 19, लेप्टो 5 तर स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या 3 इतकी होती. या आजारांची संख्या आता मलेरिया 243, गॅस्ट्रो 340, डेंग्यू 33, लेप्टो 11 आणि स्वाइन फ्लू 11 इतकी वाढली आहे.

जुलैच्या सुरुवातीपासूनच मुंबईत पावसाने जोरदार बरसायला सुरुवात झाल्यानंतर पावसाळी आजारही वेगाने वाढत आहेत. पाणी साचून राहत असल्यामुळे कीटकांचा वाढलेला प्रादुर्भाव आणि दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. यामध्ये दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार होतात. तर कीटकांच्या प्रभाकामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पालिकेची यंत्रणा सज्ज

पावसाळी आजारांचा कंट्रोल रूमच्या माध्यमातून दररोज आढावा घेण्यात येत असून कार्यवाही करण्यात येत आहे. घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असून जनजागृती करण्यात येत आहे.

पावसाळी आजारांसाठी दीड हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. पावसाळी आजार रोखण्यासाठी घरोघरी औषधे, गोळय़ांचे वाटप, तपासणीही करण्यात येत आहे.

असे वाढले आजार

मुंबईत संपूर्ण जूनमध्ये मलेरियाचे एकूण 350 रुग्ण आढळले होते. मात्र जुलैमध्ये 19 तारखेपर्यंत रुग्णांचा आकडा 243 वर पोहोचला आहे. तर संपूर्ण महिन्यात डेंग्यूचे 39 रुग्ण आढळले होते. आता या रुग्णांची संख्या 33 वर पोहोचली आहे. स्वाइन फ्लूचे 2 रुग्ण आढळले होते. या रुग्णांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.

  • मलेरिया   243
  • गॅस्ट्रो 340
  • डेंग्यू    33
  • लेप्टो   11
  • स्वाइन फ्लू      11